‘मणिकर्णिका -द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटानंतर कंगना राणौत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. आधी हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रदर्शित होणार होता. पण आता चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे आणि हे सगळे कंगनासाठी झालेय. खुद्द कंगनाने निर्मात्यांना म्हणे, रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली. कारण काय तर कंगनाचा एक तर्क.
होय, ‘मणिकर्णिका’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या रिलीजमध्ये काही महिन्यांचे अंतर असावे, असा कंगनाचा स्वत:चा तर्क आहे. कंगनाच्या मते, ‘मणिकर्णिका’ राणी लक्ष्मीबाईचे बायोपिक होते आणि ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. मार्चऐवजी आणखी काही महिन्यांनी हा चित्रपट रिलीज झाला तर त्याचा ब-यापैकी फायदा मिळेल. कंगनाचा हा तर्क कुणाला पटो ना पटो पण तो दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांना पटला आणि त्यांनी ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली.
मेकर्स लवकरच या नव्या रिलीज डेटचा खुलासा करतील, अशी शक्यता आहे. ‘मणिकर्णिका’ अद्यापही चित्रपटगृहात आहे. अशात ‘मेंटल है क्या’ येत्या २९ तारखेला प्रदर्शित झाला तर त्याच्या प्रमोशनचा अख्खा भार कंगनाच्या खांद्यावर पडेल. यामुळे कंगना प्रचंड बिझी होईल. हे टाळण्यासाठीही कंगनाने म्हणे ‘मेंटल है क्या’च्या मेकर्सला रिलीज डेट लांबणीवर टाकण्यासाठी तयार केले. काही वृत्तांच्या मते, या चित्रपटाच्या पॅच वर्कचे काम अद्यापही बाकी आहे आणि त्यामुळे रिलीज डेट पुढे ढकण्यात आलीय.