बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वांत हरहुन्नरी अभिनेत्यांची नावे घ्यायची झाल्यास रणबीर कपूर आणि राजकुमार राव या दोघांची नावे सगळ्यात वर येतील. फार कमी वेळात या दोघांनीही बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. रणबीर कपूरने आपल्या कारकिर्दीत काही फ्लॉप दिलेत. पण चाहत्यांवर त्याचा काहीही फरक पडला नाही. फार कमी वेळात तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. राजकुमारचे म्हणाल तर त्याच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण शेवटी त्याच्यातील प्रतिभा सगळ्यांपेक्षा वरचढ चढली. त्यामुळे सिनेप्रेमी या दोघांच्याही अक्षरश: प्रेमात आहेत . यांचा चित्रपट लागला रे लागला की, चाहत्यांची पाऊले चित्रपटगृहांकडे वळतात. पण आता या चाहत्यांना राजकुमार वा रणबीर या दोघांपैकी कुण्या एकाची निवड करावी लागणार आहे. होय, कारण पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रणबीर व राजकुमारच्या चित्रपटांत बॉक्सआॅफिसवर कडवी टक्कर बघायला मिळणार आहे. होय, रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि राजकुमार रावचा ‘मेड इन चायना’ हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहेत. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी काही तासांपूर्वी ही माहिती दिली.विशेष म्हणजे, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘मेड इन चायना’ या दोन्हींमध्ये एक गोष्ट कॉमन असणार आहे. ती म्हणजे, या दोन्ही चित्रपटात मौनी रॉय दिसणार आहे. ‘मेड इन चायना’मध्ये ती एका गुजराती बिझनेसमॅनच्या पत्नीच्या भूमिकेत आहे तर ‘ब्रह्मास्त्र’मध्ये निगेटीव्ह रोल साकारताना दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. आता रणबीर व राजकुमार यांच्यापैकी बॉक्सआॅफिसवरची लढाई कोण जिंकतं, ते बघूच.
बॉक्सआॅफिसवर रंगणार रणबीर कपूर व राजकुमार रावचे युद्ध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:52 PM