Join us  

​शेखर सुमनच्या घरासमोर राजपूत करणी सेनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 4:21 PM

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या जयपूर येथील सेटवर राजपूत करणी सेनेने या चित्रपटाचा विरोध ...

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या जयपूर येथील सेटवर राजपूत करणी सेनेने या चित्रपटाचा विरोध करीत तोडफोड केली होती. या प्रकरणाचा निषेध करणाºयांत शेखर सुमनचा देखील समावेश होता. ‘पद्मावती’ प्रकरणानंतर शेखर सुमनने करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा इशारा दिला होता. या विरोधात राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोखंडवाला परिसरातील अभिनेता शेखर सुमनच्या घराबाहेर आंदोलन केले. राजपूत करणी सेनेचे आंदोलनकर्ते गुजरात आणि राजस्थानवरून मुंबईत आले. रविवारी सकाळी त्यांनी शेखर सुमन यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. अभिनेता शेखर सुमन घरी नसल्याने आपण पुन्हा येऊन पब्लिसिटी काय असते हे दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान या कार्यकर्त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलिंसाना बोलावण्यात आले होते. जयपूरमधील जयगडमध्ये पद्मावती या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली होती. यावेळी सेटवर पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्ये चुकीची असल्याचे सांगत करणी सेनेने हल्ला केला. यानंतर भन्साळी यांनी चित्रीकरण थांबविले होते. या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून या प्रकरणाचा निषेधाची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. राज्यसभेतही अभिनेत्री व समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. या प्र्रकरणावर पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही प्रतिक्रिया नोंदवून दु:ख व्यक्त केले होते. पद्मावतीची भूमिका साकरताना इतिहासाची कसल्याही प्रकारे मोडतोड केली नसल्याचे मी आश्वासन देते. आमचा उद्देश केवळ एक शूर महिलेच्या धाडसी कार्याची जगाला ओळख करून द्यायचा असल्याचे तिने सांगितले होते.