Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या खोलीबाहेर रात्री दोघं बंदुक चालवायचे", राकेश रोशन यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:25 IST

राकेश रोशन सध्या 'द रोशन्स' या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीमुळे चर्चेत आहेत.

शाहरुख आणि सलमान या दोघांचा सुपरहिट सिनेमा म्हणजे 'करण अर्जुन'. १९९५ मध्ये आलेल्या या सिनेमाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. नुकतीच त्यांची 'द रोशन्स' डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. यामध्ये रोशन कुटुंबाचे किस्से, आठवणी, सगळं आहे. बॉलिवूडच्या काही कलाकारांनीही सीरिजमध्ये आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. दरम्यान 'करण अर्जुन'च्या पडद्यामागच्या गोष्टीही यातून सर्वांसमोर आल्या.

राकेश रोशन यांनी सीरिजनिमित्त अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,"करण अर्जुन वेळी शाहरुख सलमान दोघंही तरुण अभिनेते होते. त्यामुळे ते सेटवर सतत प्रँक्स करायचे. मला त्रास द्यायचे. मी कधीकधी खूप चिडायचो. पण स्वत:वर नियंत्रण ठेवावं लागायचं. त्यांची मस्ती कधी कधी मर्यादेबाहेरही जायची. मी त्यांच्यासमोर वडिलांसारखं कडक राहायचो आणि त्यांना समजवायचो."

दोघं नेमके कसे प्रँक करायचे याविषयी  विचारल्यावर राकेश रोशन म्हणाले, "माझ्या खोलीबाहेर दोघं चक्क बंदूक चालवायचे. मी रात्री झोपलेला असायचो आणि बाहेर बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज यायचा किंवा बाटल्यांचा आवाज यायचा. काय करताय तुम्ही असं मी त्यांना विचारल्यावर ते सांगायचे की आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत."

द रोशन्स डॉक्युमेंटरीत शाहरुखने सेटवरील त्याच्या वर्तनाची माफी मागितली. तो म्हणाला, "मला पिंकीजींचा चांगलाच ओरडा पडला होता. सलमान आणि माझ्यात मी जरा समजूतदार होतो पण मीही त्यात सामील असल्याने त्यांना माझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. मी म्हणायचो मी काही केलं नाही सगळं सलमाननेच केलं." 

टॅग्स :राकेश रोशनशाहरुख खानसलमान खानबॉलिवूड