सध्या द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीज चर्चेत आहे. शशी रंजन दिग्दर्शित ही डॉक्यु-सिरीज १७ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. यामध्ये बॉलिवूडच्या प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक असलेल्या अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan)च्या कुटुबांतील प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष, आव्हानं, यश दाखवलं जाणार आहे. यानिमित्ताने आता राकेश रोशन (Rakesh Roshan ) यांच्यावर अंडरवर्ल्डकडून झालेला हल्ला चर्चेत आलाय. तुम्हाला माहितेय राकेश रोशन यांच्यावर गोळीबार का झाला होता, याबद्दल आपण जाणून घेऊया.
२००० हे वर्ष रोशन कुटुंबासाठी चढ-उतारांनी भरलेलं होतं. १४ जानेवारी २००० रोजी हृतिक रोशनचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' (Kaho Na Pyaar Hai ) प्रदर्शित झाला होता. 'कहो ना प्यार है' हा चित्रपट हृतिक रोशनसाठी एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातून त्याला जे स्टारडम मिळाले ते आजपर्यंत कोणत्याही स्टारने मिळवलेले नाही. पण, याच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवसांनंतरच राकेश रोशन यांच्यावर मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता.
डी-कंपनीचा गँगस्टर अली बुधेशच्या टोळीने राकेश रोशनवर हल्ला केला होता. असं म्हटलं जातं की, 'कहो ना प्यार है'च्या यशानंतर अंडरवर्ल्डकडून पैशांची मागणी झाली होती. पण, फक्त पैसा नाही तर अंडरवर्ल्डला हृतिक रोशनदेखील हवा होता. एका मुलाखतीमध्ये राकेश रोशन यांनी हा खुलासा केलाय. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी सांगितले की, "अंडरवर्ल्ड गुन्हेगारांची इच्छा होती की हृतिक रोशनने त्यांच्या चित्रपटात काम करावं. पण, मी त्यांना हृतिक व्यस्त असून त्याच्याकडे तारखा नाहीत असे सांगून टाळलं, आणि खरं होतं. पण, त्यांनी इतर निर्मात्यांच्या तारखा काढून त्या देण्यास सांगितलं. मी तसं करण्यास नकार दिला".
दरम्यान, राकेश रोशन यांच्यावर २१ जानेवारी २००० रोजी संध्याकाळी सांताक्रूझ वेस्ट टिळक रोड येथील त्यांच्या ऑफिसबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या चकमकीत त्यांच्या डाव्या हाताला आणि छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोर घटनास्थळावरून लगेचच पळून गेले होते. गोळी त्याच्या हृदयाच्या स्पर्श करून त्यांच्या छातीच्या हाडाजवळ अडकली होती. पण, उपचारानंतर त्यांचे प्राण वाचले. या गोळीबाराच्या घटनेनंतर हृतिक रोशनने सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, वडिलांसोबत जे काही घडले, त्यासाठी तो स्व:ताला जबाबदार धरत होता. एवढंच काय तर तो अभिनयदेखील सोडणार होता.