मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री विवाह बंधनात अडकलेल्या पाहायला मिळत आहे. अनेक जण जीवनाची नवी सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, त्यासोबतच लोकप्रिय झालेली एक जोडी आता वेगळी होत आहे. त्या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत घटस्फोट घेत असल्याची माहिती फॅन्ससोबत शेअर केली आहे.
बिग बॉस हिंदीच्या सिझन १५ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या राखी सावंत आणि रितेश सिंह ही जोडी आता वेगळी होत आहे. या दोघांनी बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये राखी आणि रितेशमधील प्रेमापेक्षा मतभेदच जास्त करून सगळ्यांना दिसले. बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सिझनच्या एका टप्प्यावर रितेश सिंह याला बाहेर पडावे लागले होते. हा सिझन संपल्यावर आता राखी सावंतने घटस्फोट घेत असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे.
व्हेलेंटाइन डे वेळी हे घडायला नको होते
राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रिय फॅन्स आणि हितचिंतक, मी आणि रितेश यांनी एकमेकांपासून वेगळे होत घटस्फोट घेत आहोत. बिग बॉस शो नंतर बरेच काही घडले आणि मला काही गोष्टी माहिती नव्हत्या, ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या. आम्ही आमच्यातील दोष, चुका, वेगळेपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकविध गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु, मला वाटते की, आम्ही दोघेही मैत्रीपूर्णपणे पुढे जाणे चांगले आहे आणि आम्ही दोघेही स्वतंत्रपणे आमच्या जीवनाचा आनंद घेत आहोत. या सर्व प्रकारामुळे अतिशय दु:खी झाले आहे. हे सगळे व्हेलेंटाइन डे वेळी व्हायला नको होते. मात्र, हा अतिशय क्लेषदायक निर्णय घ्यावा लागत आहे. मी रितेशला पुढील वाटचालीसाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. माझ्यासाठी आयुष्याच्या या टप्प्यावर मला माझ्या कामावर आणि माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचे आहे. मला नेहमी समजून घेतल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबाबत धन्यवाद, अशी एक पोस्ट राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.
दरम्यान, राखी सावंतच्या या पोस्टवर अनेक फॅन्सच्या कमेंट आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चाहत्यांनी राखी सावंतला सपोर्ट केल्याचे दिसत असून, काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.