अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अट केली आहे. या प्रकरणात राज कुंद्राविरोधात भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. राज कुंद्राला यानंतर २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या समर्थनार्थ राखी सावंत पुढे आली आहे. तिच्या वक्तव्यानं सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राखी सावंतनं राज कुंद्राच्या अटकेवर निराशा व्यक्त केली. तसंच तिनं शिल्पा शेट्टी हिचं कौतुक करत ती मेहनती अभिनेत्री असल्याचं म्हटलं. "शिल्पा शेट्टी या सर्व परिस्थितीतून जाण्यायोग्य व्यक्ती नाही," असंही ती म्हणाली. तिनं राज कुंद्रावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत त्याला ब्लॅकमेल करण्याचे आणि त्याची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं तिनं पापाराजीशी बोलताना म्हटलं.
"असं काही नाहीये. काही लोक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत आहेत. मी तिच्यावर मानापासून प्रेम करते. शिल्पा शेट्टीनं खुप मेहनत केली आहे हे मला लक्षात आहे. हा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे. राज कुंद्रानं असं काही केलं असेल हे मी मानू शकत नाही," असं राखी सावंत म्हणाली.
गुन्हा दाखलभारतीय कायद्यातील ज्या कलमांतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये दोषी आढळल्यास राज कुंद्रा याला ५ ते ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. राज कुंद्राविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात क्राईम ब्रँचने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याच्याविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ४२०, ३४ आणि आयटी कायदा कलम ६७, ६७अ आणि अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील भादंवि कलम ४२० आणि आयटी कायदा कलम ६७ अ हे अजामिनपात्र आहेत. त्यामध्ये सात आणि पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.