राखी सावंत (Rakhi Sawant) दिसली रे दिसली की पापाराझींची गर्दी होते. पापाराझींसोबत राखी मनातलं सगळं बोलते. सुख, दु:ख सगळं काही शेअर करते. पण सध्या राखीसाठी अतिशय कठीण काळ आहे. राखीची आई रूग्णालयात आहे आणि कॅन्सरशी लढतेय. दुसरीकडे शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर राखीवर अटकेची टांगती तलवार आहे. काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीसोबत झालेल्या लग्नावरून किती ड्रामा झाला, ते तर तुम्ही पाहिलंच. अशास्थितीत राखीला पाहून पापाराझी तिच्यामागे धावले. पण यावेळी राखी नाराज झाली आणि रडू लागली.
सेलिब्रिटी फाेटोग्राफर विरल भयानीने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात राखी तिच्या एका मैत्रिणीसोबत दिसतेय. राखीला पाहून पापाराझी तिच्याकडे धावले. हे पाहून राखी काहीशी नाराज झाली. मला एक गोष्ट सांगा, मी मरेल तेव्हा माझ्या थडग्यावरही याल का, माझी स्थिती तुम्हाला ठाऊक नाही. माहित नाही काय होईल, असं ती पापाराझींना म्हणाली आणि मग अचानक भावुक होत रडू लागली. राखीला रडताना पाहून पापाराझींनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. प्लीज, असं काही बोलू नकोस, सगळं ठीक होईल, असं ते म्हणाले. पण राखीने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिथून निघून गेली.
कायम हसणारी, एंटरटेन करणारी राखी अशी रडताना पाहून युजर्सही दु:खी झालेत. अनेकांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केली. अनेकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोलही केलं. गायक राहुल वैद्य यानेही राखीच्या या व्हिडीओवर कमेंट केली. अरेरे राखी, क्या हो गया, असं तो कमेंट करत म्हणाला.
राखी सावंतच्या आईवर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरीकडे राखीवर अटकेची टांगती तलवार आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर गेल्या १९ जानेवारीला पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राखी सावंतला 1 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटाळला होता. याला राखीने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं आहे. राखी सावंत विरोधात 1 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे, निर्देश न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी पोलिसांना दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शर्लिन चोप्राने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीवर गुन्हा दाखल केला आहे.