Join us

Rakhi Sawant: आदिलने लग्न स्वीकारलं नाही तर..., मीडियासमोर ढसाढसा रडली राखी सावंत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 11:54 AM

Rakhi Sawant: राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावा केला. लग्नानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केलेत. मात्र यानंतर लगेच आदिलने राखीसोबत लग्न केल्याचा इन्कार केला. साहजिकच राखीला मोठा धक्का बसला आहे...

टेलिव्हिजनवरील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा तिच्या  खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावा केला. लग्नानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केलेत. अगदी लग्नासाठी फातिमा हे नावही तिने धारण केलं. मात्र यानंतर लगेच आदिलने राखीसोबत लग्न केल्याचा इन्कार केला. साहजिकच राखीला मोठा धक्का बसला आहे. आदिलने जर हे लग्न मानलं नाही तर हा लव्ह जिहाद असेल, असं राखी म्हणाली. मीडियासमोर ती ढसाढसा रडली.

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो अलीकडे व्हायरल झाले होते. यानंतर राखीने स्वत: लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केलेत. ७ महिन्यांपूर्वीच मी आदिल खान दुर्राणीशी लग्न केलं होतं. जुलै २०२२ मध्ये आम्ही कोर्ट मॅरेज आणि निकाह केला होता, असा दावा राखीने केला. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. मात्र आदिलने हे मानण्यास साफ नकार दिला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना राखीला रडू कोसळलं होतं. “आदिलने मला स्वीकारलं नाही तर हे लव्ह-जिहादच आहे. जर त्याने माझा स्वीकार केला तर हा लव्ह-मॅरेज असेल, निकाह असेल. मी साफ मनाने हा निकाह केला होता. मी अल्लाहकडे विनंती करते की आदिलने हे लग्न स्वीकारावं किंवा मग अल्लाहने माझा जीव घ्यावा. आता हा कलंक मला सहन होत नाही”, असं ती म्हणाली हाेती. यानंतर मुंबईत पापाराझींसोबत बोलतानाही राखी ढसाढसा रडली.

अद्याप माझ्या आईला माहित नाहीये. कालच माझ्या कुटुंबाला सगळं काही कळलं. आईला ही गोष्ट कळता कामा नये, असं सगळे मला म्हणाले. माझ्या नशीबातच इतकं दु:ख का आहे, मला माहित नाही. मी घशाखाली घास उतरतोय, ना रात्रीची झोप येतेय, असं म्हणत राखी ढसाढसा रडू लागली. आदिलचे कुटुंब काय म्हणतेय, असं विचारल्यावर ती म्हणाली, आदिलच्या कुटुंबीयांसोबत माझं बोलणं झालं. ते खूप चांगले आहेत. तू खरंच निकाह केला असेल तर मान्य कर, असं त्यांनी आदिलला समजवलं आहे. मला स्वीकारायला कदाचित त्यांना काही वेळ लागेल. पण आदिलने तर माझ्यासोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत.

राखीचा हा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेजण तिला सांत्वना देत आहेत. तू समजूतदारपणे निर्णय घेत नाहीस, सगळे तुझा वापर करतात,असं एका युजरने लिहिलं आहे. मला राखीला असं रडताना पाहून वाईट वाटतंय, असं एका युजरने म्हटलं आहे. अर्थात काहींनी राखी ड्रामा करत असल्याचंही म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. राखीच्या आईला कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमरचं निदान झालं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :राखी सावंत