देशात कोरोना व्हायरस पसरवण्यास तबलिगी जमात जबाबदार असल्याचे वक्तव्य करून भारताची आघाडी महिला कुस्तीपटू बबीता फोगाट चर्चेत आली. यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. मग काय, बबीताने स्वत:च्या बचावासाठी ट्विटरवर जणू मोहिमच उघडली. पण म्हणून बबीताला ट्रोल करणारे थांबले नाहीत. आता तर चक्क ड्रामा क्वीन राखी सावंतही मैदानात उतरलेली दिसतेय. होय, बबीता आणि राखीची ही ‘दंगल’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
राखीने तिच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने बबीताला चांगलेच झोडपून काढले आहे. देशातील इतकी आघाडीची कुस्तीपटू असे कसे काय बोलू शकते? असा सवाल तिने केला आहे. ‘सध्या देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. अशास्थितीत देशवासियांना एकत्र ठेवणे आपले कर्तव्य आहे. इतक्या कठीण स्थितीत समाजात फूट पाडणे योग्य नाही. देशातला प्रत्येक मुसलमान आपल्या देशावर प्रेम करतो. काही चुकीच्या माणसांमुळे अख्या समाजाला चुकीचे ठरवणे चांगली गोष्ट नाही. तुझे नाव फोगाट आहे, पण म्हणून फुकटचे सल्ले देऊ नको. तू तुझ्या वक्तव्यासाठी देशाची माफी मागायला हवी, ’ असे राखीने या व्हिडीओत म्हटले आहे.
काय म्हणाली होती बबीता फोगाट
कोराना व्हायरस ही भारताची दुसरी मोठी समस्या आहे तर तबलिगी जमात ही अद्यापही नंबर एकवर आहे, असे ट्विट बबीताने केले होते. तिच्या या ट्विटवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. काहींनी तर बबीताचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणीही लावून धरली होती. अर्थात काही लोकांनी तिला पाठींबाही दिला होता. ट्रोल करणा-यांना बबीताने आणखी खरपूस शब्दांत उत्तर दिले होते. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि कोणत्याही धमक्यांना घाबरण्यासाठी मी जायरा वसीम नाही, असेही ती म्हणाली होती.