अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉस मराठी सीझन 4 च्या घरातून 9 लाख घेऊन बाहेर पडली आहे. पण यानंतर घरी परतताच तिला एक वाईट बातमी मिळाली, जी राखीने आता चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राखीने सांगितले की, कॅन्सरनंतर तिची आई जया यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने हॉस्पिटलमधून रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिची आई देखील पाहायला मिळत आहे.
राखीच्या आईला ब्रेन ट्यूमर
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत सांगते की, ती रविवारी रात्रीच बिग बॉस मराठी सीझन 4 मधून बाहेर पडली. "मी बाहेर येताच मला कळलं की आईची तब्येत ठीक नाही. आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत. मम्मीला कॅन्सर आहे आणि आता तिला ब्रेन ट्यूमर झाला आहे. तुम्ही कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईला प्रार्थनांची गरज आहे" असं राखी सांगत आहे.
यानंतर राजेश नावाची एक व्यक्ती समोर येते. राखीने त्यांना विचारले काय झाले? ते म्हणतात - आईच्या शरीराचा डाव्य़ा भागाला अर्धांगवायू झाला होता. आम्ही त्यांना रुग्णालयात आणले. येथे त्याचे स्कॅन आणि एमआरआय करण्यात आले, तेव्हा कळले की त्यांना ब्रेन ट्यूमर आहे. त्यांना आधीच कॅन्सर झाला आहे.
राखीने डॉक्टरांशीही संवाद साधला. त्यांनी सांगितले की राखीच्या आईच्या फुफ्फुसात कॅन्सर पसरला आहे. त्याच्या चाचण्या झाल्या असून, त्याचे निकाल येणे बाकी आहे. त्यानंतरच त्याला रेडिएशन थेरपी कशी आणि किती द्यायची हे ठरवले जाईल. राखीच्या आईवर रेडिएशन व्यतिरिक्त काहीही चालणार नाही. त्यांच्यावर दुसरा कोणताही इलाज नाही.
राखी सावंतने चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणते की माझी आई प्रार्थनेने बरी होऊ शकते यावर माझा विश्वास आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. गायिका अफसाना खानने कमेंट केली, 'राखी, हिंमत ठेव.' अभिनेत्री महिमा चौधरीने लिहिले, 'माझ्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करत आहे. 'मी तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी प्रार्थना करत आहे,' अशी प्रतिक्रिया सोफिया हयातने दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"