आज देशात सगळीकडे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधनवर आधारीत बॉलिवूडमध्ये बरीच गाणी आहेत. ज्यातून भावा-बहिणींचं अतूट नातं रेखाटण्यात आलं आहे. जाणून घेऊया कोणती आहेत ही गाणी
बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा हैबहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है हे गाणं धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. १९७४ साली आलेल्या रेशम की डोर या चित्रपटातील हे गाणं असून शंकर- जयकिशन यांचं संगीत लाभलं आहे. तर हे गाणं शैलेंद्र यांच्या लेखणीतून साकार झालं आहे. तर सुमन कल्याणपुर यांचा स्वरसाज या गाण्याला लाभला आहे.
फुलों का तारों का सबका कहना है१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील फुलों का तारों का सबका कहना है हे गाणं असून आजही हे गाणं खूप लोकप्रिय आहे. देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन देव आनंद यांनीच केलं होतं.
ये राखी बंधन है ऐसा १९७२ मध्ये आलेल्या ‘बेईमान’ या चित्रपटातील रक्षाबंधनचे तेव्हाचे गाजलेलं गाणं होतं. शंकर- जयकिशन यांचे संगीत असलेले हे गाणं लता मंगेशकर यांच्या सूरांनी सजलं आहे. मनोज कुमार, राखी, प्राण, स्नेह लता आणि प्रेमनाथ हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना हे गाणं सऱ्हास आपल्याला ऐकायला मिळतं. हे गाणं अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले असून १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील आहे. हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आलंय. यात नंदा आपल्या भावाला म्हणजे बलराज साहनी यांना राखी बांधताना हे गीत म्हणताना दिसतात. शंकर जयकिशन यांनी या गाण्याला संगीत दिले असून शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिले आहे. तर लता मंगेशकर यांनी हे गाणे गायलं आहे.
मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतनराम माहेश्वरी दिग्दर्शित काजल या चित्रपटातील मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन हे गाणं असून या गाण्यात भावा- बहिणीचं अनोखं नातं रेखाटण्यात आलं आहे. मीना कुमारी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याला आशा भोसले यांचा सुरेख आवाज लाभला आहे. साहिर लुधियान्वी यांनी हे गाणे लिहिले असून रवी यांनी त्याला संगीत दिले आहे. या गाण्यात मीना कुमारी आपल्या भावाला हे गाणं गाऊन त्याच्यासाठीचं प्रेम व्यक्त करते.