Join us  

Arjun Kapoor : अर्जून कपूरने रक्षाबंधनानिमित्त पुरुषांना दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:08 PM

अभिनेता अर्जुन कपूरने रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

बहीण-भावाचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. अभिनेता अर्जुन कपूरनेरक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. अर्जून कपूरने पुरुषांना मोलाचा सल्ला दिला आहे. अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्जुन कपूरने एक व्हिडीओ शेअर करत देशातील महिलांच्या सुरक्षेवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.  तो म्हणाला, "मी माझ्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा करणार आहे. पण, सध्या जे काही घडत आहे, ते पाहून काय बोलावं हेच समजत नाहीये. समाजातील काही पुरुषांमध्ये  मूलभूत समज आणि शिक्षणाचा अभाव दिसतोय. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी राखी बांधतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन दिलं जातं. पण, बहिणी मोकळेपणाने फिरू शकतील असे सुरक्षित वातावरण कसे बनवायचे हे आपल्याला का शिकवले जात नाही?", असा सवाल त्याने केला. 

पुढे अर्जुन म्हणाला, "पुरुषांना स्त्रियांचे संरक्षण करण्यास शिकवण्याऐवजी स्त्रियांना सुरक्षित कसे वाटले, हे शिकवण्याची गरज आहे. हा एक खूप मोठा विषय आहे. यामध्ये चर्चा, शिक्षण आणि मूलभूत समज गरजेची आहे. जिचा आपल्या इकोसिस्टममध्ये अभाव आहे.  मला माहित नाही की यामुळे लोकांच्या विचारात किती बदल होईल. एक भाऊ म्हणून, एक पुरुष म्हणून, मला वाटतं की आपण आपल्या आयुष्यातील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यांना सुरक्षित वाटेल, असं वातावरण तयार करायला हवं".

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार (Kolkata Doctor Rape and Murder Case) करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे देशातील समाजमन ढवळून निघालं आहे. देशभरातुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :अर्जुन कपूरसेलिब्रिटीपश्चिम बंगालरक्षाबंधन