Join us  

'राक्षस जिंकला आणि...', श्रद्धा वालकरची चिठ्ठी वाचून कंगना राणौतचं हेलावलं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:28 PM

Kangana Ranaut on Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकरचं २०२० सालातील एक पत्र समोर आले आहे. तिची चिठ्ठी वाचल्यानंतर कंगना खूप दुखावली गेली आहे.

श्रद्धा वालकर(Shraddha Walkar Murder Case)ची हत्या प्रकरणाने सगळीकडे खळबळ माजवली आहे. पालघर येथील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. नुकतेच श्रद्धाचे २०२० मधील तारखेचे एक पत्र समोर आले आहे, ज्यानुसार तिने आफताब पूनावाला तिला मारून तुकडे तुकडे करेल असे म्हटले होते. हे पत्र वाचून कंगना रणौत (Kangana Ranaut) भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे.

श्रद्धाची चिठ्ठी वाचल्यानंतर कंगना खूप दुखावली गेली आहे. श्रद्धाच्या पत्राचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 'हे २०२० मध्ये पोलिसांच्या मदतीसाठी श्रद्धाने लिहिलेले पत्र आहे. तो तिला नेहमी घाबरवायचा आणि तिचे तुकडे करण्याची धमकी द्यायचा. त्याने लिहिले आहे की, तो तिला ब्लॅकमेल करत असे पण त्याने तिचे ब्रेनवॉश कसे केले आणि तिला आपल्यासोबत दिल्लीला नेले हे तिला कळले नाही. त्याने तिला जगापासून वेगळे केले आणि एका काल्पनिक जगात नेले.

कंगनाने पुढे लिहिले की, 'आपल्या सर्वांना माहित आहे की हे 'लग्नाचे वचन देऊन' केले होते. ती कमजोर नव्हती. ती एक मुलगी होती, या जगात जगण्यासाठी जन्माला आली होती पण दुर्दैवाने तिच्या आत एक स्त्रीचे मन होते, ज्याची नैसर्गिक प्रवृत्ती संरक्षण आणि जखम भरून काढण्याचे होते. आपल्या पृथ्वीप्रमाणेच स्त्रीलाही असा गर्भ आहे, जो कोणाशीही भेदभाव करत नाही. ती त्या सर्वांना दत्तक घेते, मग ते पात्र असो वा नसो.

कंगनाने पुढे लिहिले की, 'ती परीकथांवर विश्वास ठेवायची. तिला विश्वास होता की जगाला तिच्या प्रेमाची गरज आहे. ती देवी होती जिच्यात जखमा बरे करण्याचे सामर्थ्य होते. ती कमकुवत नव्हती, ती एक परीकथेत राहणारी मुलगी होती. ती परीकथेतील तिच्या नायकामध्ये लपलेल्या राक्षसांशी लढण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रेम आपल्याला व्यापून टाकते. तिने राक्षसांना मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण राक्षस जिंकला आणि तेच झाले...' कंगनाची ही लांबलचक पोस्ट सांगते की तिला या प्रकरणाचा खूप राग आहे आणि ती श्रद्धाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :कंगना राणौतश्रद्धा वालकर