बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. अरबाज खान, रणदीप हुड्डापर्यंत अनेकांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. आता इंडस्ट्रीतील आणखी एक प्रसिद्ध जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. यातच आता रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या गँगने थायलंडमध्ये बॅचलर्स पार्टी केली आहे. या धमाल बॅचलर्स पार्टीचे फोटो समोर आले आहेत.
रकुलची जवळची मैत्रीण प्रज्ञा जयस्वालने तिच्या इंस्टाग्रामवर बॅचलर्स पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रकूल ही एन्जॉय करताना दिसत आहे. या पार्टीत दोघांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तर शनिवारी रकुल प्रीतच्या घरी अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले होते. खुद्द अभिनेत्रीने फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या फोटोवरुन अभिनेत्रीच्या घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी या महिन्याच्या २२ तारखेला लग्न करणार आहेत. मात्र, या जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. १९ फेब्रुवारीपासून लग्नसोहळा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या कपलचं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. या जोडप्याने आधी परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतातच लग्न समारंभ आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकीनं आपला निर्णय बदलला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रकुल ही 'छत्रीवाला' आणि 'आय लव्ह यू' या चित्रपटात दिसली होती. 2024 मध्ये ती 'मेरी पत्नी का रीमेक' आणि 'इंडियन 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचे चाहते दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर जॅकी भगनानी हा लोकप्रिय सिनेनिर्माता आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.