बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रती सिंह (Rakul Preet Singh) गेल्या १५ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. आधी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिने भूमिका साकारल्या तर नंतर ती बॉलिवूडमध्ये स्थिरावली. रकुल यावर्षीच जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनातही अडकली. रकुलने नुकतंच इंडस्ट्रीतील नेपोटिझमवर भाष्य केलं. तिलाही याचा सामना करावा लागल्याचं ती म्हणाली.
रकुल प्रीत सिंहने २०१४ साली 'यारियाँ' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने 'दे दे प्यार दे', 'थँक गॉड', 'छत्रीवाली' सारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं. इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आहे हे तिने स्वीकारलं. तसंच तिला आधी मिल्ट्रीत जायचं होतं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला काही अनुभव सांगितले. रकुल म्हणाली, "मला सैन्यात जायचं होतं. माझे वडील मला त्यांचे अनुभव सांगायचे. इंडस्ट्रीतील नेपोटिझमचा मी फारसा विचार करत नाही. ते सगळीकडे असतं. माझ्याकडून अनेक सिनेमे त्यामुळे गेले आहेत. पण मी ते मनात धरुन बसणारी मुलगी नाही. त प्रोजेक्ट माझ्यासाठी नव्हताच असं मी समजते आणि पुढे जाते."
ती पुढे म्हणाली, "अनेक संधी जातातच हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्ही पुढे जाता. मेडिकल क्षेत्राचंच उदाहरण घ्या जर कोणी डॉक्टर बोर्डात सामील होऊ शकला नाही आणि त्याच्या जागी दुसऱ्याला पाठवण्यात येतं, तेव्हा हा आयुष्याचा एक भाग आहे असंच समजून पुढे जावं लागतं."
रकुल प्रीत सिंह लवकरच अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे 2' मध्ये दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'इंडियन 2' मध्येही ती झळकली.