कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. सगळे उद्योगधंदे बंद असल्याने सरकारला मिळत असलेले टॅक्स देखील बंद झालेले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने दारूची दुकानं सुरू करण्याचा नुकताच निर्णय घेतला. पण दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर तळीरामांनी वाईन शॉपजवळ गर्दी केली. एवढेच नव्हे तर कित्येक किलोमीटरच्या रांगा देखील लावल्या. पण या सगळ्यात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रकुल प्रीत सिंहच्या हातात काही वस्तू दिसत आहेत. विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत रकुलने मास्क घातला असून ती एका दुकानातून काही सामान घेत बाहेर येत आहे आणि रस्ता ओलांडताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. रकुल दारू खरेदीसाठी घराच्या बाहेर पडली होती का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सोशल मीडियावर ही चर्चा पाहाता अखेरीस रकुलनेच ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे.
रकुलने एक ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, मेडिकल स्टोरमध्ये दारू देखील विकली जाते हे मला माहीतच नव्हते... रकुलला सोशल मीडियावर काहीही कारण नसताना ट्रोल करणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे रकुलच्या या उत्तराची सगळीकडेच चर्चा होत आहे.