अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या सोमवारी भारत दौ-यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तसारी सुरु असताना ‘माझ्या स्वागतासाठी भारतात 1 कोटी लोक उपस्थित असतील,’ असा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक उपरोधिक ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होतेय.
‘ट्रम्प यांच्या स्वागताला 1 कोटी लोकही येऊ शकतात. फक्त यासाठी ट्रम्प यांच्या बाजूला अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कतरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लिओनी यांना उभे करावे लागले,’ असे राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले.
काय म्हणाले होते ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौ-यासाठी फारच उत्साहित आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसतोय. अहमदाबाद येथे त्यांच्या स्वागतासाठी दहा मिलीयन अर्थात एक कोटी भारतीय उपस्थित राहणार आहेत, असा दावा ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकेतील कोलराडो येथे आयोजित सभेत केला होता. याआधी ट्रम्प यांनीच 50 लाख आणि 70 लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा केला होता. भारतात माझ्या स्वागतासाठी तब्बल 10 मिलियन लोक उपस्थित राहणार आहेत, असे मी ऐकले आहे. स्टेडियमवर हे लोक जमणार असून ही संख्या 60 लाख ते एक कोटीपर्यंत असू शकते. स्टेडियम फुल भरणार असून लोकांना बाहेर उभे राहावे लागेल, असेही ट्रम्प म्हणाले होते.