Join us

अखेरीस राम गोपाल वर्मानेच दिली कबुली, या कारणामुळे केले होते कोरोना झाले असल्याचे ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 5:45 PM

राम गोपाल वर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देराम गोपाल वर्माने सांगितले आहे की, सध्या देशात गंभीर परिस्थिती असून अशा परिस्थितीत विनोद करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण नैराश्यात जाऊ शकतो. त्यामुळेच मी हे ट्वीट केले.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. भारतासह जगातील अनेक देशातील लाखो लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. हजारो मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही हा आकडा वाढतोय. प्रत्येकजण मनातून घाबरला आहे. पण अशात काही लोक अफवा पसरवत आहेत. तर काहींना या महामारीच्या कठीण प्रसंगात विनोद सुचतोय. एकीकडे लोक साध्या कोरोनाच्या नावाने देखील घाबरत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्माने यावरून लोकांना एप्रिल फुल बनवले होते.

राम गोपाल वर्माने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ट्वीट केले होते की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आत्ताच माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले.’ त्याच्या या ट्वीटने सर्वत्र खळबळ माजली होती. मात्र काहीच वेळात त्याने दुसरे ट्वीट करून हे एप्रिल फुल असल्याचे स्पष्ट केले होते. ‘निराश करण्यासाठी क्षमा मागतो. पण आता डॉक्टरांनी मला हे एप्रिल फूल असल्याचे सांगितलेय. ही त्यांची चूक आहे, माझी नाही.’ 

राम गोपालचे पहिले ट्वीट पाहून लोक चिंतेत सापडले होते. तेच लोक त्याचे हे दुसरे ट्वीट पाहून भडकले. पण आता राम गोपाल वर्मानेच मिड-डे ला मुलाखत देऊन त्याने हे ट्वीट का केले याबाबत सांगितले आहे. त्याने या मुलाखतीत सांगितले आहे की, सध्या देशात गंभीर परिस्थिती असून अशा परिस्थितीत विनोद करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण नैराश्यात जाऊ शकतो. त्यामुळेच मी हे ट्वीट केले. खरे तर हे ट्वीट केल्यानंतर मला ट्रोल केले जाणार याची मला चांगलीच कल्पना होती. आता तर लोकांना चुकीची माहिती दिल्याबद्दल माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण त्या दिवशी एक एप्रिल असल्याने तो केवळ एप्रिल फूलचा विनोद होता.

एक एप्रिलला केलेला हा विनोद अंगलट येऊ शकतो, हे पाहून राम गोपाल वर्माने तिसरे ट्वीट करून स्वत:चा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील केला होता. त्याने ट्वीट केले होते की, ‘मी केवळ वातावरण हलके फुलके करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हा विनोद माझ्यावर होता. यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर मी प्रामाणिक माफी मागतो.’ 

टॅग्स :राम गोपाल वर्माकोरोना वायरस बातम्या