कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. भारतासह जगातील अनेक देशातील लाखो लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. हजारो मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही हा आकडा वाढतोय. प्रत्येकजण मनातून घाबरला आहे. पण अशात काही लोक अफवा पसरण्यात मस्त आहेत. तर काहींना या महामारीच्या कठीण प्रसंगात विनोद सुचतोय. होय, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा त्यापैकीच एक. एकीकडे लोक साध्या कोरोनाच्या नावाने घाबरत असताना रामगोपाल वर्मा यांनी यावरून लोकांना एप्रिल फुल बनवले.
होय, काल राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि सगळ्यांना धक्का बसला. ‘मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आत्ताच माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले,’ असे ट्विट त्यांनी केले.
त्यांच्या या ट्विटने सर्वत्र खळबळ माजली. मात्र काहीच वेळात, त्यांनी दुसरे ट्विट करून हे एप्रिल फुल असल्याचे स्पष्ट केले.‘निराश करण्यासाठी क्षमा मागतो़ पण आता डॉक्टरांनी मला हे एप्रिल फुल असल्याचे सांगितलेय. ही त्यांची चूक आहे, माझी नाही,’ असे वर्मा यांनी दुस-या ट्विटमध्ये लिहिले.
रामगोपाल यांचे पहिले ट्विट पाहून लोक चिंतेत सापडले होते. तेच लोक त्यांचे हे दुसरे ट्विट पाहून भडकले. हे प्रकरण, हा विनोद अंगलट येऊ शकतो, हे पाहून रामगोपाल वर्माही सावध झाले. मग काय, तिसरे ट्विट करून स्वत:चा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना ते दिसले. ‘मी केवळ वातावरण हलके फुलके करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हा विनोद माझ्यावर होता. यामुळे कुणी दुखावले असेल तर मी प्रामाणिक माफी मागतो,’ असे लिहित त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
होणार का कारवाई?कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुणीही एप्रिल फुल करणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे महाराष्ट्र सरकारने, पोलिसांनी आधीच स्पष्ट केले होते. असे असतानाही रामगोपाल वर्मा यांनी लोकांना एप्रिल फुल बनवले. ते सुद्धा कोरोनाच्या संदर्भात. अशात त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न आहे.
याला तुरुंगात डांबाकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल फुल बनवणारे राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झालेत. लोकांनी त्यांना नाही नाही ते सुनावले. याला तुरुंगात डांबा, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
इतकी भीषण स्थिती असताना याला विनोद सुचतो तरी कसा? असा सवाल अनेक युजर्सनी केला. हा जोक नाही, असे अनेकांनी राम गोपाल वर्मा यांना सुनावले.