दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘लक्ष्मीज् एनटीआर’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आज २९ मार्चला हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला, अपवाद केवळ आंध्र प्रदेश या राज्याचा. होय, राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्रात हा चित्रपट रिलीज केला गेला नाही. येत्या ३ एप्रिलपर्यंत आंध्रात हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी लादण्यात आली आहे. दोन अज्ञात याचिकाकर्त्यांनी लोकसभा निवडणूक संपेपर्यंत हा चित्रपट रिलीज होऊ नये, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना रिलीजच्या एक दिवस आधी न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत आंध्रात या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती दिली.
रामगोपाल वर्मा यांच्या या चित्रपटात अभिनेते व राजकीय नेते एन टी रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. एन टी रामाराव यांच्या आयुष्यात त्यांच्या दुसºया पत्नी लक्ष्मी पार्वती यांची एन्ट्री झाल्यानंतरचा प्रवास या चित्रपटात दाखवला गेला आहे. तूर्तास या चित्रपटावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर काहींनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे तर काहींनी याला ‘बकवास’ चित्रपट ठरवले आहे.चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. ट्रेलरमध्ये एनटीआर हे एन. चंद्राबाबूला ‘साप’ म्हणून संबोधित करताना दाखवले होते. आंध्राचे विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू हे एनटीआर यांचे जावई आहेत. या ट्रेलरनंतर चंद्राबाबू समर्थकांनी या चित्रपटाला विरोध करत, तो प्रदर्शित न करण्याची मागणी केली होती.एनटीआर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निमार्ता म्हणून काम केले आहे. सिनेसृष्टीत एनटीआर यांना मोठे यश लाभले. यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी बसावा टाकाराम यांच्याशी पहिले लग्न केले. पहिल्या पत्नीपासून त्यांना ८ मुले आणि ४ मुली झाल्या. त्यानंतर १९९३ साली लक्ष्मीपार्वती यांच्याशी एनटीआर यांनी दुसरे लग्न केले. १९८२ साली एनटीआर यांनी तेलुगू देसम पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले.