Join us

‘मर्डर’मुळे रामगोपाल वर्मा गोत्यात, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:17 PM

फादर्स डेच्या दिवशी म्हणजे गेल्या 21 जूनला रामगोपाल वर्मा यांनी ‘मर्डर’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती.

ठळक मुद्देपी. बालास्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. फादर्स डेच्या दिवशी म्हणजे गेल्या 21 जूनला रामगोपाल वर्मा यांनी ‘मर्डर’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती. हाच सिनेमा वादाचे कारण ठरला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि चित्रपट निर्माता नट्टी करुणा यांच्या विरोधात नलगोंडा पोलिसांनी मिरयालागुडा टाऊन - पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध तेलंगाना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा दाखल केला आहे. 

पी. बालास्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पी. बालास्वामी यांचा मुलगा प्रणय कुमार याची 2018 मध्ये त्याचा सासरा मारुती राव याने हत्या केली होती. दलित असलेल्या प्रणयकुमार याने उच्चवर्णीय  मुलीसोबत लग्न केले. या रागातून  प्रणय याची हत्या केल्याचे हे प्रकरण आहे. बालस्वामी यांनी गेल्या महिन्यात न्यायालयाचा दरवाचा ठोठावत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मुलगा प्रणय आणि त्यांची सून अमृता यांची छायाचित्र त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता चित्रपटात वापरली गेली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. 

दलित समुदायातील प्रणय  याची 14 सप्टेंबर 2018 मध्ये मिरयालागुडा येथे दिवसाढवळ्या हत्या झाली होती. आपली आई आणि पत्नीसोबत खासगी रुग्णालयातून बाहेर येत असताना ही हत्या केली होती. हत्येची घटना सीटीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणात उच्चवर्णीय मारुती राव आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. प्रणय याची हत्या करण्यासाठी राव याने मारेक-यांना एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. पुढे त्याने मार्च 2020 मध्ये हैदराबाद येथे आत्महत्या केली.

टॅग्स :राम गोपाल वर्मा