मंदाकिनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहून करते हे काम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 04:39 PM2018-07-30T16:39:26+5:302018-07-31T08:00:00+5:30
मंदाकिनीने नव्वदीच्या दशकात बॉलिवूडला रामराम ठोकला. नव्वदीच्या दशकात तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. यामुळे बॉलिवूडमधील अनेकजण तिच्यासोबत काम करायला तयार नव्हते. नव्वदीच्या दशकात तिला चित्रपट मिळणेच बंद झाले.
‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून एका रात्रीत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मंदाकिनी आठवतेय. मंदाकिनीला या एका चित्रपटाने कधी नव्हे इतकी प्रसिद्धी, ग्लॅमर दिले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची जितकी प्रशंसा झाली, तितकीच तिने यात दिलेल्या बोल्ड दृश्यांचीही चर्चा झाली. ‘राम तेरी गंगा मैली’ सुपरहिट झाला आणि मंदाकिनीच्या दारापुढे फिल्ममेकर्सच्या रांगा लागल्या. यानंतर मंदाकिनी अनेक चित्रपटांत दिसली. पण करिअर ऐनभरात असताना अचानक बॉलिवूडमधून दिसेनासीही झाली.
मंदाकिनीने नव्वदीच्या दशकात बॉलिवूडला रामराम ठोकला. नव्वदीच्या दशकात तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. यामुळे बॉलिवूडमधील अनेकजण तिच्यासोबत काम करायला तयार नव्हते. नव्वदीच्या दशकात तिला चित्रपट मिळणेच बंद झाले. तिने या काळात केवळ देशवासी आणि जोरदार या दोनच चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटानंतर तिने बॉलिवूड कायमचे सोडले आणि डॉ. कग्यूर टी. रिनपोचे ठाकूर यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. ती दलाई लामा यांची फॉलोव्हर असून आता तिब्बतन हर्बल सेंटर चालवते आणि योगा क्लासेस घेते. तिला एक मुलगी असून तिच्या मुलीचे नाव रब्जा इनाया ठाकूर असे आहे. याचसोबत तिला एक मुलगा देखील होता. पण २००० मध्ये एका अपघातात त्याचे निधन झाले.
मंदाकिनीचा जन्म एका अॅग्लो- इंडियन कुटुंबात झाला. तिचे खरे नाव यास्मिन जोसेफ आहे. बॉलिवूडमध्ये यास्मिनची मंदाकिनी झाली. पण मंदाकिनीचा बॉलिवूडचा प्रवास फार छोटा राहिला. ‘राम तेरी गंगा मैली’ हा तिचा पहिला चित्रपट. यानंतर अनेक चित्रपट केलेत. पण अचानक ती दिसेनासी झाली. याचकाळात तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतही जोडले गेले. पण मंदाकिनीने आजपर्यंत यावर खुलासा दिलेला नाही. मंदाकिनीसोबत शारजहाँ येथे मॅच पाहणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या फोटोने त्यावेळी बरीच खळबळ निर्माण केली होती. पण मी दाऊदला ओळखत नाही, असे सांगून मंदाकिनीने यावर बोलणे त्यावेळी टाळले होते.