Adipurush Teaser : प्रभास व सैफ अली खानचा ‘आदिपुरूष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीजआधीच वादात सापडला आहे. कालपरवा ‘आदिपुरूष’चा टीझर रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी या चित्रपटाला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘आदिपुरूष’मधील रावण आणि हनुमानाला पाहून सगळेच बिथरले. सिनेमातील रावण व हनुमानाचा लुक लोकांच्या पचनी पडला नाही. सिनेमातील व्हिएफएक्स दृश्यांवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली. सिनेमातील कलाकारांची निवडच चुकली, असं म्हणत अनेकांनी या सिनेमाला ट्रोल करायला सुरूवात केली. राजकीय पक्षही या चित्रपटाच्या विरोधात उतरले. फक्त पब्लिसिटीसाठी देव देवतांना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा करत भाजपचे राम कदम आक्रमक झालेत. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता ‘रामायण’ (Ramayan) मालिकेत लक्ष्मणाची (Lakshman) भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri ) यांनी ‘आदिपुरूष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील लहरी म्हणाले, ‘आदिपुरूषचा टीझर पाहिल्यानंतर सध्या तरी मी तटस्थ नाही. मी ना पूर्णपणे सकारात्मक आहे, ना पूर्णपणे नकारात्मक़ कारण मेकर्सनी टीझरमध्ये केवळ भूमिकांची ओळख करून दिली आहे. ज्यामुळे मी अस्वस्थ होईल, असं सध्या तरी त्यांनी काही दाखवलेलं नाही. माझ्या मते, प्रदर्शनाआधी चित्रपट चर्चेत राहावा, यासाठी विनाकारण असे वाद निर्माण केले जातात. पण यानिमित्ताने मी केवळ एवढंच सांगेल की,या देशात आणखी मूर्खपणा सहन केला जाणार नाही. आमच्या धार्मिक भावना, आमचा धर्म आणि ज्यांना आम्ही देव म्हणून पुजतो त्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. आता हा जुना भारत देश राहिलेला नाही. आता आम्ही एकजूट आहोत.
व्हीएफएक्स इफेक्ट पचत नाहीत...आदिपुरूषमधील व्हीएफएक्स इफेक्ट पचत नाहीत. आमच्या काळात हे तंत्रज्ञान फार नवीन होतं. त्यामुळे आम्ही अतिशय मेहनतीने उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला होता. आज 35 वर्षांनंतरही रामायण मालिकेची लोक प्रशंसा करतात. आमच्यावेळी हे तंत्रज्ञान असतं तर रामानंद सागर यांनी आणखीच अफलातुन असं काही बनवलं असतं. पण आम्ही जे काही बनवलं ते अप्रतिम होतं. त्यामागे कष्ट होते. आजच्या लोकांना मेहनत नको आहे. हनुमानजी राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेऊन जातात, तो सीन शूट करण्यासाठी आम्हाला 4 दिवस लागले होते, असंही सुनील लहरी म्हणाले.