कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सिनेसृष्टीही बंद असल्यामुळे शूटिंग होत नाही. यामुळे टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी डेली एपिसोड नसल्यामुळे जुन्या एव्हरग्रीन मालिका पुन्हा प्रसारीत केल्या जात आहेत. त्यातील लोकप्रिय मालिका म्हणजे रामायण. ऐंशीच्या दशकात ज्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सुरू झाली होती तेव्हा लोक हातातील सगळी कामे बाजूला ठेवून शेजारांच्या टीव्हीवर मालिका पाहण्यासाठी जात होते. सकाळी 9 वाजता सर्व गल्ली सामसूम होत होत्या. पाहिलं तर आज लॉकडाउनमुळे सगळीकडे सामसूम झालं आहे. रामायणमध्ये अशीच एक भूमिका होती ती म्हणजे कैकेयीची. अभिनेत्री पद्मा खन्नाने ही भूमिका साकारली होती.
पद्मा खन्नाने कैकेयीची भूमिका खूप उत्तम साकारली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही लोक तिचा तिरस्कार करू लागले होते. पद्मा खन्ना आता सिनेसृष्टीतून गायब झाल्या आहेत. १९८७ मध्ये प्रसारित झालेल्या रामायणाव्यतिरिक्त पद्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने आपल्या करियरची सुरूवात भोजपुरी चित्रपटामधून केली होती.
१९६१ मध्ये भैया चित्रपटामध्ये तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. १९७० मध्ये पद्मा खन्नाला जॉनी मेरा नाम या चित्रपटामधून लोकप्रियता मिळाली.
पद्मा खन्नाला आजसुद्धा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या सौदागर चित्रपटामुळे आठवले जाते. या चित्रपटाचे गाणे सजना है मुझे आजदेखील खूपच लोकप्रिय झाले होते. तिने वेगवेगळ्या भाषांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण जास्त करून तिला सर्व चित्रपटांमध्ये डान्सरचीच भूमिका साकारायला मिळाली. यामध्ये लोफर, जान-ए-बहार, पाकीजा सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
पतीच्या निधनानंतर पद्मा मुलांसोबत मिळून डान्स अकादमी सांभाळते. पद्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.