यंदाच्या ऑस्कर सोहळ्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. एसएस राजमौली (SS Rajamauli) यांच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला मिळालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्डनंतर हे गाणं आता ऑस्करच्याही शर्यतीत आहे. आरआरआरची टीम ऑस्कर सोहळ्यासाठी लॉस एंजिलिस येथे पोहोचली आहे. सुपरस्टार रामचरणने (Ramcharan) आपल्या चाहत्यांसाठी एक विशेष मीट अॅंड ग्रीट (Meet and Greet) इव्हेंटचे आयोजन केले होते. यावेळी चाहत्यांचे प्रेम बघून रामचरण भारावून गेला.
अभिनेता रामचरणने आयोजित केलेल्या या इव्हेंटमध्ये अनेक भारतीय आणि परदेशी चाहत्यांनी हजेरी लावली. सर्वांसोबत रामचरणने सेल्फी आणि फोटो काढत आनंद व्यक्त केला. यावेळी तो म्हणाला, 'अमेरिकेच्या विविध राज्यातील माझ्या चाहत्यांना भेटून मला खूप आनंद होत आहे. हे प्रेमच मला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत असतं. चाहत्यांशी संवाद साधताना मजा येते आणि मी मेगा फॅन्स असोसिएशनचे यासाठी आभार मानतो.'
रामचरण पत्नी उपासनासोबत अमेरिकेत आहे. दोघांनी एकत्र छान वेळही घालवला. या ट्रिपविषयी सांगताना तो म्हणाला, 'ही ट्रीप खरंच खूप स्पेशल आणि कधीही न विसरता येणारी आहे. हे मी केवळ तेलुगू म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून सांगत आहे.आरआरआरने इतिहास रचला आहे आणि हे केवळ तेलुगू आणि भारतीयांमुळेच शक्य झालं आहे.'
या इव्हेंटमध्ये रामचरण व्हाईट सूटमध्ये आला होता आणि त्याने गॉगल घातला होता. ज्यात तो कमालीचा स्मार्ट दिसत होता. शेकडो चाहत्यांनीही यावेळी त्याला गराडा घातला. रामचरणने सर्वांसोबत सेल्फी आणि फोटो क्लिक केले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही तासांतच ऑस्कर सोहळा सुरु होणार आहे. बेस्ट ओरिजिनल सॉंग म्हणून 'नाटू नाटू' गाण्याला नॉमिनेशन आहे. तसंच या अवॉर्ड सोहळ्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण दोघेही त्यांची हुकस्टेप परफॉर्म करणार आहेत.