'द काश्मीर फाइल्स' ( The Kashmir Files) या सिनेमानंतर आता 'द केरळ स्टोरी'मुळे (the kerala story)मोठा गदारोळ माजला आहे. या सिनेमामुळे संपूर्ण देशातील वातावरण तापलं आहे. काही लोकांना या सिनेमाला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी सडाडून टीका करत त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर यात राजकीय व्यक्तिमत्वांनीही उडी घेतली आहे. सध्या प्रसिद्ध अभिनेता योगेश सोमण (yogesh soman) यांनी या सिनेमाविषय़ी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या सिनेमाची कथा रामदास स्वामी यांनी शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवली होती असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या सोशल मीडियावर योगेश सोमण यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 'द केरळ स्टोरी'वर भाष्य केलं आहे. सोबतच रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाचं वाचन केलं आहे.
काय म्हणाले योगेश सोमण?
“दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमामध्ये या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काही जणांनी चित्रपटातील सत्यता आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण याच दरम्यान, अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची ‘वन लाइन’ कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.”
किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या ।किती शांबूखी जहाजी फाकविल्या ।किती एक देशांतरी त्या विकिल्या ।किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील श्लोकाच्या या चार ओळी ‘द केरळ स्टोरी’ची संपूर्ण कथा सांगतात.
पुढे ते म्हणतात, यातील ‘शांबूखी’ हा शब्द 'शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, ‘किती शांबूखी जहाजी फाकविल्या’ म्हणजे ‘किती शहामुखी जहाजा पाठवल्या’. रामदास स्वामींनी चार ओळीतून संपूर्ण ‘द केरळ स्टोरी’ची कथा शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे.
दरम्यान, योगेश सोमण त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणासाठी ओळखले जातात. समाजात कोणतीही घटना घडली की ते त्यावर व्यक्त होत असतात. यावेळी त्यांनी द केरळ स्टोरीवर भाष्य करत पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.