बॉलिवूडमध्ये नवव्दीच्या दशकात एक खलनायक नायकाइतका प्रसिद्ध झाला होता. त्याला पडद्यावर पाहाताच लोकांना त्याची भीती वाटत असे. त्याने कधी कर्नल चिकारा बनून लोकांना घाबरवलं तर कधी अण्णा बनत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण केली. या अभिनेत्याचे नाव रामी रेड्डी असून या खलनायकाला एकेकाळी नायकापेक्षादेखील प्रसिद्धी मिळाली होती.
रामी रेड्डी यांचे पूर्ण नाव गंगासानी रामी रेड्डी असून त्यांचा जन्म आंध्र प्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यात झाला होता. त्यांचे शिक्षण देखील हैद्राबाद मध्ये झाले होते. त्यांनी पत्रकारिेतेचे शिक्षण घेतले होते. चित्रपटांमध्ये येण्याआधी ते पत्रकार होते. पण अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्राकडे वळले. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात तेलुगू चित्रपटांद्वारे केली. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतानाच त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. १९९० मध्ये आलेल्या प्रतिबंध या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांच्या अण्णा या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. रामी यांच्या अभिनयासोबतच नेहमीच त्यांच्या लूकची चर्चा होत असे.
रामी यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण एका आजारपणामुळे त्यांच्या आयुष्याला वळण मिळाले. या आजारपणामुळे त्यांचे वजन कित्येक किलो कमी झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना ओळखणे देखील कठीण जात होते. ते लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या या आजारपणामुळे ते बॉलिवूडमध्ये कधीच कमबॅक करू शकले नाही.
काही महिने उपचार केल्यानंतर १४ एप्रिल, २०११ साली सिकंदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा निरोप घेतला. रामी रेड्डी यांनी वक्त हमारा है, ऐलान, दिलवाले, खुद्दार, अंगरक्षक, आंदोलन, हकीकत, अंगारा, रंगबाज, कालिया, लोहा, चांडाला, हत्यारा, गुंडा, दादा, जानवर, कुर्बानियाँ आणि क्रोध यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.