Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) हे बॉलिवूडचं सगळ्यात क्यूट कपल आज 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकलं. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थित या जोडप्यानं लग्न उरकलं. पंजाबी पद्धतीने आलिया व रणबीरचं लग्न पार पडलं. यावेळी कपूर व भट कुटुंबातील जवळचे नातेवाईक व बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके काही मित्रमंडळी तेवढेच उपस्थित होते. या लग्नाचा एकही फोटो वा व्हिडीओ लीक होऊ नये, यासाठी कपूर व भट कुटुंबानं अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अगदी नवरा-नवरीची झलकही दिसणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे लग्न उरकलं पण अद्याप तरी लग्नाचा एकही फोटो बाहेर आलेला नाही. आलिया व रणबीरचे चाहते यामुळे काहीसे हिरमुसले आहेत. पण चिंता नसावी. होय, कारण आलिया व रणबीरचा अख्खा लग्नसोहळा तुम्हाला पाहता येणार आहे.
म्हणून सुरक्षेवर खर्च केले कोट्यवधी रूपये?रणबीर व आलियाचं लग्न इतकं प्रायव्हेट ठेवण्यामागे एक कारण होतं. होय, चर्चा खरी मानाल तर या लग्नाच्या फोटो व व्हिडीओंचे हक्क एका OTT प्लॅटफॉर्मला विकण्यात आले आहेत. काही महिन्यात रणबीर व आलियाच्या लग्नाचं फुटेज ओटीटी वर स्ट्रीम होणार आहे. रिपोर्टनुसार, आलिया व रणबीरच्या लग्नाचे राईट्स खरेदी करण्यासाठी संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मने 90 ते 110 कोटी इतकी मोठी रक्कम चुकती केलीये. अर्थात अद्याप कपूर वा भट कुटुंबापैकी कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. याआधी कतरिना कैप व विकी कौशल यांनी आपल्या लग्नाचे सर्व राईट्स सुमारे 80 कोटीत विकल्याचं वृत्त आलं होतं.