‘ब्रह्मास्त्र’ ( Brahmastra ) हा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रिम प्रोजेक्ट. हा सिनेमा बनायला चार वर्षे लागलीत. या काळात अनेकदा हा चित्रपट रखडला. पण आता ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजसाठी सज्ज आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटची ( Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या 9 सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर बायकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.या शुक्रवारपासून ‘ब्रह्मास्त्र’चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि रविवारी सकाळपर्यंत या अॅडव्हान्स बुकिंगला असा काही प्रतिसाद मिळाला की, बॉलिवूडच्या जीवात जीव आला. गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत. बड्या बड्या चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकले सुद्धा नाहीत. यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ला मिळालेला हा प्रतिसाद पाहून बॉलिवूडकर सुखावले नसतील तर नवल.
अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीनुसार, वृत्त लिहिपर्यंत 65 हजारांवर तिकिटं विकली गेली होती. चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमुळे झालेली कमाई 2.55 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. यात ब्लॉक सीट्सला जोडलं तर रिलीजआधीच या चित्रपटाने 4 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ भारतात जवळपास 5000 स्क्रीन्सवर रिलीज होतो आहे.
‘भुल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड मोडणार?यंदा बॉलिवूडच्या ‘भुल भुलैय्या 2’ला सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग मिळालं होतं. कार्तिक आर्यनच्या या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 6.55 कोटींची कमाई केली होती. ‘ब्रह्मास्त्र’च्या अॅडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड पाहता, सोमवारी हा सिनेमा ‘भुल भुलैय्या 2’चा रेकॉर्ड मोडू शकतो.
पहिल्या दिवशी इतकी होणार कमाई?भुल भुलैय्या 2 हा सिनेमा 2022 या वर्षातला सर्वाधिक मोठी ओपनिंग मिळालेला सिनेमा होता. कार्तिक आर्यनच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 14.11 कोटींचं कलेक्शन केलं होतं. मात्र ‘ब्रह्मास्त्र’च्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘ब्रह्मास्त्र’ कार्तिकच्या सिनेमाला मात देऊ शकतो. पहिल्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ 20 कोटींची कमाई करेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.