रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही चाहत्यांची लाडकी जोडी. 'ये जवानी है दीवानी','तमाशा' या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं. रणबीर आणि दीपिकाचा वेगळा चाहतावर्ग असला तरी जोडी म्हणूनही त्यांनी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता ही जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे. आगामी एका सिनेमात दोघंही कॅमिओ करणार आहेत. दरम्यान सिनेमात मुख्य भूमिकेत कोण आहे माहितीये का?
अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) काही दिवसांपूर्वीच आगामी सिनेमाची घोषणा केली. 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' असं सिनेमाचं टायटल आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनखाली सिनेमाची निर्मिती होत आहे. याच सिनेमात रणबीर-दीपिका कॅमिओ करणार आहेत. फक्त ते दोघंच नाही तर 'ये जवानी है दीवानी'मधील आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन सुद्धा दिसणार आहेत. नैना आणि बनीला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून यामधून 'ये जवानी है दीवानी'च्या आठवणीही ताज्या होणार आहेत.
कार्तिक आर्यनच्या अपोझिट सिनेमात शर्वरी वाघ लीड रोलमध्ये दिसू शकते. 'मुंज्या' सिनेमाच्या यशानंतर शर्वरी वाघ सर्वांच्या नजरेत आली आहे. त्यामुळे करण जोहर सिनेमासाठी शर्वरीचा विचार करत आहे. मिड डे रिपोर्टनुसार, मेकर्स दोन वेगवेगळ्या युनिव्हर्सला या सिनेमातून एकत्र आणण्याची योजना आखत आहेत. ज्यामुळे दोन वेगवेगळ्या गोष्टींचं मिलन होऊ शकेल. यावरुन 'ये जवानी है दीवानी' चाही पुढचा पार्ट येणार का अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.