Join us  

Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 2:51 PM

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. 

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित  'ॲनिमल' सिनेमा शुक्रवारी(१ डिसेंबर) प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. जिकडेतिकडे सर्वत्र फक्त  'ॲनिमल'ची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा बिग हिट ठरत आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. 

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेला  'ॲनिमल' चित्रपटाची केवळ देशातच नाही तर परदेशातही क्रेझ पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत रणबीर कपूरच्या  'ॲनिमल'ने शाहरुख खानच्या 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या सिनेमाने देशात २०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरातही  'ॲनिमल' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ३५६ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

शाहरुखच्या 'पठाण'ने तीन दिवसात जगभरात ३१८ कोटींची कमाई केली होती. 'पठाण'चा हा रेकॉर्ड  'ॲनिमल' सिनेमाने मोडीत काढला आहे. पण, शाहरुखच्या 'जवान'चा रेकॉर्ड ब्रेक करणं अद्याप रणबीरच्या सिनेमाला जमलेलं नाही. 'जवान'ने तीन दिवसांत  वर्ल्डवाइड ३८४ कोटींची कमाई केली होती. 

दरम्यान, संदीप वांगा यांचं दिग्दर्शन असलेला 'ॲनिमल' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमातील रणबीरचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटासाठी आतुर होते.  'ॲनिमल' मधील गाणीही प्रचंड हिट झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर  'ॲनिमल' इतर सिनेमांना तगडी टक्कर देत आहे.  

टॅग्स :रणबीर कपूररश्मिका मंदानाअनिल कपूरबॉबी देओल