अभिनेता रणबीर कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी कॅमेर्याच्या मागे काम केले होते. वडील ऋषी कपूर यांच्या १९९९ च्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता.
'आ अब लौट चलें' नंतर रणबीरला 2005 मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर 2007 मध्ये रणबीरने 'सांवरिया' साईन केला. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याच्याआधी रणबीरने एका लघुपटात काम केले होते आणि या लघुपटाला ऑस्करसाठी नामांकन देखील मिळाले होेते.
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते बी.आर. चोप्रा यांचा नातू अभय चोप्राने कर्मा हा एक लघुपट दिग्दर्शित केला होता. या लघुपटात सर्वप्रथम रणबीरने काम केले होते. 2004 मध्ये रणबीर एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवत होता, तेव्हा या लघुपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. या लघुपटाला स्टुडंट ऑस्करसाठी नामांकन देखील मिळालं होतं.
या लघुपटात रणबीर कपूरसोबत जेलरची प्रमुख भूमिका बॉलिवूड अभिनेता शरद सक्सेनाने साकारली होती. त्याचबरोबर मिलिंद जोशी आणि सुशोवन बॅनर्जी हे देखील मुख्य भूमिकेत होते. हा लघुपट 5 मे रोजी वांद्रे फिल्म फेस्टिव्हल या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एका जेलरला त्याच्या मुलास देहदंडाची शिक्षा द्यावी लागते, तेव्हा त्याच्या मनातील कोंडी, भावना याचं चित्रण या लघुपटात करण्यात आलं होतं.