रणबीर कपूर आहे समजून मुली त्याच्या गळ्यात पडायच्या, त्याच्या मागे लागायच्या. तो कोण तर जुनैद शाह. रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणून तो ओळखला जायचा. हाच जुनैद आज आपल्यात नाही. श्रीनगरच्या इलाही बाग येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. शुक्रवारी त्याने जगाचा निरोप घेतला. काश्मिरी पत्रकार युसूफ जमील यांनी जुनैदच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युसूफ यांच्या घराशेजारीच जुनैदचे घर आहे. आमचा शेजारी निसार अहमद शाह यांचा मुलगा जुनैद शाह याचे निधन, असे ट्वीट युसूफ यांनी केले आहे.
ऋषी कपूर यांनी जुनैदसाठी केले होते ट्वीटरणबीर कपूरसारखा हुबेहुब दिसणारा जुनैद सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. रणबीर कपूर शिवाय रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी एकदा जुनैदसाठी ट्वीट केले होते. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी रणबीर व जुनैदचा एक फोटो शेअर केला होता. ‘ओएमजी, माझ्या मुलाचा डुप्लिकेट. वचन देऊ शकत नाही. पण चांगला आहे,’ असे ऋषी कपूर यांनी लिहिले होते.
जुनैद काश्मिरमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. मॉडेलिंगच्या दुनियेत तो आपले नशीब आजमावत होता. सोशल मीडियावर त्याचे प्रचंड फॉलोअर्स होते. जुनैदची हेअर स्टाईल, त्याचा फॅशन सेन्स अगदी रणबीर कपूरसारखा होता.
चेहरा, उंची, केस, सर्वकाही रणबीर कपूरसारखे असल्याने मुली अक्षरश: त्याच्यावर मरायच्या. त्याच्या मागे वेड्या व्हायच्या. अनेक जण त्याला रणबीर समजून त्याच्या भोवती सेल्फीसाठी गर्दी करत. रणबीरचा ‘सावरियां’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा जुनैद 17 वर्षांचा होता. काश्मीर युनिव्हर्सिटीमध्ये तो एमबीए करत होता. सोबत मॉडेलिंगही करत होता.