अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) न्यायालयाच्या कचाट्यात सापडली आहे. तिच्याविरोधात वॉरंट जारी झालं आहे. 2018 च्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलंय. फसवणूक, धमकी आणि चेक बाऊंन्स प्रकरणी अनेकदा समन्स बजावूनही अमिषा कोर्टात हजर राहिली नसल्याने अखेर रांची दिवाणी न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं आहे.
2018 साली झारखंडचे सिनेनिर्माते अजय कुमार सिंह (Ajay Kumar Singh) यांनी अमिषा पटेलविरोधात तक्रार दाखल केली होती. सिनेमा बनवण्याच्या नावाखाली अडीच कोटी घेतले पण अद्याप सिनेमाच्या निर्मितीच केली नाही. ना अडीच कोटी परत केले. यामध्ये अमिषाचा पार्टनर कुणालही सामील आहे. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असं दोघांनी सांगितलं. 2013 साली 'देसी मॅजिक' या सिनेमाचं शूट सुरु झालं. पण अद्याप सिनेमा प्रदर्शित झाला नाही. अमिषाने 2018 मध्ये अजय कुमारला 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले जे बाऊन्स झाले.
अजय कुमार यांच्या तक्रारीनंतर अमिषा पटेल आणि पार्टनर कुणाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक वेळा समन्स बजावूनही अमिषा आणि कुणाल दोघंही कोर्टात हजर होत नव्हते. तसंच वकिलांनाही कोर्टात पाठवत नसल्याने आता रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंड जारी केले आहे. त्यामुळे अमिषाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अमिषा पटेल बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवकरच तिचा 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. बऱ्याच वर्षांनंतर सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी मोठी पडद्यावर येत आहे.