बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सरबजीत', 'हायवे', 'जिस्म २', 'रंग रसिया' अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारून त्याने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. पण बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर घडवत असताना त्याला अनेक कठीण प्रसंगांतून जावं लागलं. एक वेळी अशी होती जेव्हा रणदीप हुड्डा नैराश्यात होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत त्याने खुलासा केला आहे.
अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे रणदीप हुड्डाला डिप्रेशन आलं होतं. याबाबत खुलासा करताना तो म्हणाला, "२०१६ मध्ये राजकुमार संतोषी यांच्या 'बॅटल ऑफ सारागढी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत होतो. याच दरम्यान २०१८मध्ये अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचीही घोषणा करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून एकाच मुद्द्यावर भाष्य केलं गेलं होतं. पण, 'केसरी' चित्रपटाच्या अपयशामुळे बॅटल ऑफ सारागढी सिनेमालही प्रदर्शित केला गेला नाही. यामुळे मी नैराश्यात गेलो होतो."
"या चित्रपटासाठी तीन वर्ष लागली होती. चित्रपटात ईशर सिंहची भूमिका साकारण्यासाठी मी तीन वर्ष माझे केस आणि दाढी वाढवली होती. मी जीव तोडून मेहनत केली होती. या चित्रपटासाठी मी अनेक सिनेमांना नकार दिला होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे मला डिप्रेशन आलं होतं. कोणीतरी मला खूप मोठा धोखा दिलाय असं मला वाटत होतं," असंही पुढे त्याने सांगितलं.
नैराश्यात गेल्यानंतरच्या अवस्थेबद्दलही रणदीप हुड्डाने या मुलाखतीत खुलासा केला. तो म्हणाला, "कोणी माझी दाढी कापू नये, यासाठी मी स्वत:ला खोलीमध्ये बंद करून घ्यायचो. माझे आईवडील माझ्या कायम बरोबर असायचे. त्यानंतर मी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला."