बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. वीर सावरकर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये रणदीप सध्या व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिनेमासाठी घर विकल्याचा खुलासा रणदीपने केला आहे.
रणदीपचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुनच त्याला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. रणदीपने वीर सावरकर सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाच्या माझा कट्टा या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याला सिनेमाला प्रपोगंडा म्हणण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना रणदीप म्हणाला, "कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना. कोणी काहीही बोललं तरी मला माहीत आहे की मी हा सिनेमा कशासाठी बनवला आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. सावरकरांवरील अन्यायाविरोधात मी हा सिनेमा बनवला आहे. मी स्वत:चं घर विकून हा सिनेमा बनवला आहे. तुम्ही कोणत्या प्रपोगंडाबद्दल बोलत आहात? ३० किलो वजन कमी करून एक-दीड वर्ष एका प्रपोगंडा सिनेमासाठी कोण कशाला घालवेल?".
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजूही रणदीप हुड्डाने सांभाळली आहे. या सिनेमातून तो दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. मराठमोळी अंकिता लोखंडेही 'वीर सावरकर' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. २२ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.