लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) या बायोपिकमुळे सध्या चर्चेत येत आहे. २२ मार्च रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. महेश मांजरेकर (mahesh manjarekar) दिग्दर्शित या सिनेमासाठी रणदीपने त्याच्या लूकमध्ये कमालीचा बदल केला होता. विशेष म्हणजे या सिनेमासाठी त्याने प्रचंड मेहनत घेत वजन कमी केलं होतं. मात्र, वजन कमी करणं हे त्याच्या जीवावर बेतणार होतं. एका मुलाखतीमध्ये रणदीपने या विषयीचा खुलासा केला.
अलिकडेच रणदीपने 'मिड- डे' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. दरम्यान, त्याने सरबजीत सिनेमासाठीचा प्रवास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठीचा प्रवास किती वेगळा होता हे सुद्धा सांगितलं.
"स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी मी दीड वर्ष वजन कमी करत होतो. जवळपास ३२ किलो वजन मी कमी केलं होतं. या काळात स्ट्रिकली डाएट फॉलो केल्यामुळे मला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. ज्यावेळी तुम्ही बराच काळ काहीही खात नाही तेव्हा असंच होतं. मला चालणंही कठीण झालं होतं", असं रणदीप म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला एका आठवड्याला ५ ते ७ किलो वजन कमी करायचं होतं. त्यामुळे मी इंटरमिटेंट फास्टिंग डाएट करायला सुरुवात केली. या डाएटमध्ये १६ तासांच्या अंतरावर जेवण करायचं असतं. हा नियम मी प्रामाणिकपणे फॉलो करत होतो. मला दिवसाला १ किलो वजन कमी करायचं होतं. आणि हे फार चॅलेंजिंग होतं. मला खूप अशक्त झाल्यासारखं वाटायचं. मी अनेकदा बेशुद्धही पडायचो.मला फार कंटाळा आला होता या सगळ्याचा पण मी काही गोष्टी ठरवल्या होत्या पण त्यानुसार न झाल्यामुळे मला विनाकारण दोनदा मेहनत घ्यावी लागली होती. कदाचित माझी मेहनत इतकी जास्त झाली की माझ्या जीवावर ते बेतलं असतं. एवढी माझी अवस्था वाईट झाली होती."
दरम्यान, रणदीपची मुख्य भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्यासोबत अंकिता लोखंडे, अमित सियाल हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.