वाफाळलेला चहा अन् पार्ले-जीच्या बिस्किटांची मजा काही औरच. अगदी काही महिन्यांपूर्वी पार्ले-जी कंपनी मंदीमुळे बंद होण्याच्या मार्गावर होती. पण लॉकडाऊनच्या काळात असे काही झाले की या कंपनीने 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीत 80 ते 90 टक्के वाढ झाली. साहजिकच शेअर मार्केटपासून सोशल मीडियापर्यंत पार्ले-जी हा ब्रँड चर्चेत आला आहे. आता बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने पार्ले-जी कंपनीला ट्विट केले आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्याने पार्ले-जीला एक खास आवाहन केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होताना दिसतेय.
‘माझे संपूर्ण करिअर आणि थिएटर्समधल्या आठवणी पार्ले-जी बिस्किट आणि चहाशी जोडलेल्या आहेत. पार्ले-जी कंपनीने त्यांचे पॅकिंग बायोडिग्रेडेल मटेरियल बदलेल तर किती प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक कचरा कमी होईल, याचा तुम्ही कधी विचार केला? आता जबरदस्त विक्री होत असताना पार्ले-जीची भविष्य घडवण्यामध्येही आपले योगदान देऊ शकते,’ असे ट्विट रणदीपने केले आहे.त्याच्या या ट्विटवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
देशात नेहमीच सिंगर यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे किंवा त्यावर बंदी आणण्याची मागणी होत असते. अनेक राज्यात सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. काही काळापूर्वी प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्यासाठी अभियान सुद्धा सुरू करण्यात आले होतं. देशाला प्लास्टिक मुक्त करण्याचा उद्देश यामागे होता. याच पार्श्वभूमीवर रणदीपने हे आवाहन केले आहे. आता त्याच्या या आवाहनाला पार्ले-जी कसा प्रतिसाद देते, ते बघूच.
रणदीप हुड्डा काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘एक्सट्रॅक्शन’ या सिनेमात दिसला होता. यात त्याने क्रिस हेम्सवर्थसोबत स्क्रीन शेअर केली होती. लवकरच तो सलमान खानच्या ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.