Join us

'...तर भारत 35 वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता', 'सावरकर' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 5:45 PM

Swatantrya Veer Savarkar Teaser: अभिनेता रणदीप हुड्डा चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत असून, चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे.

Swatantrya Veer Savarkar Teaser: आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अभिनेता रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर उर्फ ​​वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असून, यात रणदीप हुड्डा सावरकरांच्या भूमिकेत आहे. 

टीझरच्या सुरुवातीला सावरकरांचा, म्हणजेच रणदीप हुड्डाचा आवाज तुम्हाला ऐकू येतोय. यात तो म्हणतो, 'स्वातंत्र्यलढा 90 वर्षे चालला, पण ही लढाई काही मोजक्याच लोकांनी लढली, बाकी सगळे सत्तेचे भुकेले होते. गांधीजी वाईट नव्हते, पण जर ते त्यांच्या अहिंसेच्या विचारावर ठाम राहिले नसते तर भारत 35 वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता. यानंतर रणदीप हुड्डा बेड्यांमध्ये बांधलेला दिसतो. या टिझरमध्ये सावरकरांवर किती अत्याचार झाले, हेदेखील दाखवण्यात आले आहे.

टीझरनुसार, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, खुदीराम बोस आणि सशस्त्र क्रांतीला प्रेरणा देणारे वीर सावरकर होते. ते त्या क्रांतिकारकांपैकी एक होते, ज्यांची इंग्रजांना सर्वात जास्त भीती वाटत होती. टीझरच्या शेवटी रणदीप म्हणतो, 'रावणाची लंकाही मौल्यवान होती, रावणाची राजवट असो वा ब्रिटीश राजवट, दहन होणारच. टिझर पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवार राहणार नाहीत.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटासाठी रणदीपने खूप मेहनत घेतल्याचे टीझरवरूनच स्पष्ट होते. त्याचा लुक आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहण्यासारखा आहे. चित्रपटाच्या शीर्षकाला #WhoKilledHisStory ही टॅगलाइन जोडण्यात आली आहे. रणदीपने अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरबॉलिवूड