Join us

"ऐश्वर्या रायसोबत काम करताना..." रणदीप हुड्डाने पहिल्यांदाच सांगितला 'सरबजीत'चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:32 PM

रणदीपने 'सरबजीत' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बॉलिवूडचा प्रभावशाली अभिनेता रणदीप हु्ड्डा (Randeep Hooda) सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा होत आहे. रणदीपने याआधीही 'हायवे', 'सरबजीत' सिनेमातून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. रणदीपने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सरबजीत सिनेमात ऐश्वर्या रायसोबतचा  (Aishwarya Rai) काम करण्याचा अनुभव सांगितला. त्याने यामध्ये ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारली होती.

'सरबजीत' सिनेमाच्या आठवणी सांगताना रणदीप हुड्डा म्हणाला की सरबजीतची भूमिका जरी ऐश्वर्याने सादर केली असली तरी त्यांच्या खऱ्या फॅमिलीसोबत माझा छान बाँड झाला होता. तो म्हणाला, "ऐश्वर्या खूपच चांगली, विनम्र स्वभावाची आहे. तिने भूमिका चांगली व्हावी म्हणून खूप प्रयत्न केला. सेटवर आमची जास्त भेट झाली नाही कारण आमचे जास्तीत जास्त सीन्स हे वेगवेगळे शूट झाले. पण आम्ही जेव्हा केव्हा भेटलो तेव्हा ऐश्वर्या खरंच किती नम्र आहे हे जाणवलं. मेकर्सने तिला रियल दाखवण्याचा प्रयत्न केला पण ती खूप अनरियल आहे."

सरबजीतच्या कुटुंबासोबत झालेल्या बाँडवर रणदीप म्हणाला, "जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा ऐश्वर्यापेक्षा जास्त माझा सरबजीतच्या बहिणीसोबत बाँड तयार झाला होता. ती आता आपल्यात नाहीय तिची इच्छा होती की तिच्या मृत्यूनंतर मी तिच्या पार्थिवाला अग्नी द्यावं आणि मी तिची इच्छा पूर्णही केली. कधी कधी वाटतं तिच्यासोबत आणखी वेळ घालवता आला असता तर किती बरं झालं असतं. ती माणूस म्हणून ती खूपच चांगली होती आणि तिने खरोखरंच सरबजीतच्या मुलांचा छान सांभाळ केला. आता मुलं सेटल झाली आहेत. मी आजही त्यांच्या संपर्कात असतो. त्या सिनेमाचा माझ्या खऱ्या आयुष्यातही परिणाम झाला."

रणदीपचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्याच्या अभिनयाची सध्या सगळीकडेच प्रशंसा होत आहे. रणदीपने या सिनेमातून दिग्दर्शनातही पाऊल ठेवलं आहे. या सिनेमासाठी त्याने अक्षरश: स्वत:ला झोकून देत काम केलं आहे.

टॅग्स :रणदीप हुडाऐश्वर्या राय बच्चनसिनेमा