बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या 'शहीद दिना'चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्रांतीवीर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं रणदीप हुडानं जाहीर केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर असं चित्रपटाचं नाव असणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत असणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि संदीप सिंग करणार आहेत. निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबतचा एक फोटो देखील रणदीप हुडा यानं शेअर करत नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. तसंच रणदीपनं त्याचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो देखील शेअर केला आहे. "कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती हैं! #SwatantraVeerSavarkar यांच्या बायोपिकचा भाग बनल्याबद्दल मी खूप कृतज्ञ, उत्साहित आणि सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे.", असं कॅप्शन देत रणदीपनं त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.
क्रांतिकारी आणि हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचं आयुष्य अनेक वादांनी घेरलेलं राहिलं आहे. 28 मे 1883 रोजी जन्मलेले वीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक तर होतेच पण ते एक कुशल राजकारणी, वकील, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यामुळे सावरकरांची भूमिका पडद्यासमोर साकारण्याचं मोठं आव्हान रणदीप हुडासमोर असणार आहे. "असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, प्रत्येकाचंच नाव घेतलं जातं असं नाही. विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य नायकांपैकी एक मोठं नाव आहे. त्यांचं आयुष्य आणि विचारसरणीबाबत काही गैरसमज, वाद पसरले आहेत. ते दूर होणं गरजेचं आहे आणि ते प्रभावशाली होते. त्यांची कहाणी सांगायलाच हवी. सरबजीतनंतर संदीपसोबत स्वतंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी काम करताना मला आनंद होत आहे. ही भूमिका साकारणं आव्हानात्मक असेल", असं रणदीप हुडानं म्हटलं आहे.
"दुर्लक्षित केलेल्या कथा सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वतंत्र्यवीर सावरकर हे एक उत्कंठावर्धक सिनेमॅटिक कथन असेल जे आपल्याला आपल्या इतिहासाची उजळणी करण्यास भाग पाडेल. मला संदीप सिंगसोबत काम करायचं होतं आणि हा चित्रपट आम्ही एकत्र करत आहोत याचा मला आनंद आहे", असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं.