काहीच दिवसांपुर्वी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा टिझर भेटीला आला. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात अभिनेता रणदीप हूडा सावरकरांची प्रमुख भूमिका साकारत आहे. रणदीप हूडाच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं. अशातच रणदीपविषयी एक मोठी बातमी समोर येतेय. रणदीप यंदा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीला उभा राहण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, रणदीप हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजप त्याला हरियाणाच्या रोहतकमधून तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. रणदीप मूळचा हरियाणातील रोहतकचाच आहे. त्यामुळे सूत्रांनुसार, रणदीप स्वतः रोहतकमधून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहे. सध्या रणदीप कोणत्या भागातून निवडणूक लढवणार? आणि तो खरंच निवडणूकीला उभा राहणार की नाही? याविषयी अधिकृत खुलासा अजून झालेला नाही.
या बातमीनंतर रणदीपचे चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत. साहजिकच सर्वांच्या नजरा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. रणदीप जर भाजपकडून लोकसभा निवडणुकीला उभा राहिला तर यंदा निवडणुकांमध्ये चांगली चुरस अन् रंगत बघायला मिळेल. दरम्यान रणदीपचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.