रणदीप हूडाच्या आगामी सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'ची उत्सुकता शिगेला आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी रणदीप हूडाने केलेले विशेष प्रयत्न दिसून येते आहेत. याशिवाय रणदीपने सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी त्याची शरीरयष्टी आणि देहबोलीवर घेतलेली मेहनत सुद्धा वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. आज सावरकर पुण्यतिथीनिमित्त रणदीपने अंदमान मधील तुरुंगाचा फोटो शेअर करुन सावरकरांविषयी खास पोस्ट लिहीली आहे.
रणदीप हूडा लिहीतो, "आज भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ पुत्राची वीर सावरकरांची पुण्यतिथी. निडर क्रांतीकारक, उत्कृष्ट नेतृत्व, लेखक, तत्तवज्ञानी स्वातंत्र्यवीर सावरकर. एक असा माणूस ज्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेने आणि धाडसाने इंग्रज इतके घाबरले की त्यांना ७ बाय ११ फुटांच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं. बायोपीकमध्ये त्यांची भूमिका साकारताना ते ज्या कोठडीत होते तिथला अनुभव घेण्याचा प्रयत्न केला."
रणदीप पुढे लिहीतो, "मी त्या कोठडीत २० मिनिटंही राहू शकलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सावरकर कसे राहिले असतील, याची कल्पना मी केली. ११ वर्ष सावरकर एकटेच या कोठडीत बंदिस्त होते. तुरुंगात इंग्रज अधिकाऱ्यांची क्रूरता आणि अमानुषता सावरकरांनी सहन केली. त्यामुळे त्यांच्या अतुलनीय शक्तीची मी कल्पना केली. सशस्त्र क्रांती घडवण्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांचं योगदान इतकं प्रचंड आहे की, आजही भारतविरोधी शक्ती त्यांची बदनामी करत आहेत. नमन". रणदीपची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला रिलीज होतोय.