'स्वातंत्र्य वीर सावरकर' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकरयांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला. या सिनेमात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. चित्रपटगृहांनंतर आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होणार आहे. हा सिनेमा येत्या 28 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. ZEE5 सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती देताना ZEE5 ने पोस्टमध्ये लिहिलं, 'अखंड भारत हे त्यांचं स्वप्न होतं, हिंदुत्व त्याचा पाया होता. सावरकरांच्या 141 व्या जयंतीनिमित्त हा चित्रपट २८ मे रोजी #ZEE5 वर प्रदर्शित केला जाईल'.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात काम करण्याबरोबरच या सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. सावरकरांचा लूक यावा, यासाठी अभिनेत्याने 30 किलो वजन कमी केलं. अंकिता लोखंडेनेही या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांच्या एकूण आयुष्याचा आढावा घेण्यात आला आहे. परदेशात शिक्षण, मग तुरुंग ते काळ्यापाण्याची शिक्षा, शेवटी अनेक वर्षांनंतर विनायक दामोदर सावरकरांची घरवापसी या सगळ्या घटना चित्रपटात पाहायला मिळत आहेत. सिनेमात अनेक नामवंत कलाकारांनी या चित्रपटात विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिका साकारल्या आहेत. राजेश खेडा यांनी महात्मा गांधी, ब्रजेश झा यांनी सुभाषचंद्र बोस, संतोष ओझा यांनी बाळ गंगाधर टिळक, संजय शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू, मृणाल दत्त यांनी मदन लाल धिंग्रा, चिराग पंड्या यांनी नथुराम गोडसे या भूमिका साकारल्या आहेत.