रणधीर कपूर यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारी असल्याने ते जास्तीत जास्त वेळ घरीच घालवतात. पण नुकतेच त्यांना मुलगी करिनाच्या घराच्या बाहेर पाहाण्यात आले.
बबिता यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंबाने करिनाच्या घरी त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यावेळी रणधीर यांना गाडीत उतरल्यावर चालण्यासाठी दोन जणांच्या आधाराची गरज घ्यावी लागली. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड वाईट वाटले. रणधीर यांनी त्यांची काळजी घ्यावी असे त्यांचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. रणधीर यांचा हा व्हिडिओ वीरल भयानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून हा व्हिडिओ 12 तासांत 2 लाख 33 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
ऋषी कपूर, राजीव कपूर या भावंडाच्या निधनानंतर रणधीर कपूर पूर्णपणे कोलमडले आहेत. ऋषी आणि राजीव यांच्या निधनामुळे मी पूर्णपणे कोलमडलो होतो असे रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. गेल्या काही महिन्यात माझ्या घरातील सदस्यांच्या एकामागे एक झालेल्या निधनामुळे मी संपूर्णपणे कोलमडून गेलो आहे. राजीवला कधीच कोणत्या प्रकारचा आजार नव्हता. राजीव खूपच खेळकर वृत्तीचा होता. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. आता मी त्या घरात एकटाच शिल्लक राहिलो आहे.
त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीव आणि ऋषी यांचा एक तरुणपणातील फोटो शेअर केला होता आणि त्यासोबत लिहिले होते की, मी तुम्हाला खूप मिस करतोय... तुम्ही जिथे असाल तिथे सुखात राहा...