आदित्य चोप्रा हा आज आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता असून त्याने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मोहोब्बते, रब ने बना दी जोडी यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आदित्य प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते यश चोप्रा यांचा मोठा मुलगा असून त्याचा आज म्हणजेच २१ मे ला वाढदिवस असतो. यश चोप्रा यांच्या नंतर त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आदित्य बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आला. आदित्यने एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले. त्यामुळे आज बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या दिग्दर्शकांसोबत त्याची तुलना केली जाते. चोप्रा बॅनरचा आज आदित्य सर्वेसर्वा आहे.
आदित्य बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक असला तरी तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. आदित्य चोप्राने २०१४ मध्ये राणी मुखर्जीसोबत लग्न केले आणि त्यामुळे मीडियात त्याच्या नावाची जास्तच चर्चा होऊ लागली. हे आदित्यचे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न पायल खन्नासोबत झाले होते. पायल ही एका बड्या उद्योगपतीची मुलगी आहे. आदित्यला आपले वैयक्तिक आयुष्य लोकांसोबत शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तो कधी मुलाखतींमध्ये देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणे टाळतो.
आदित्य आणि राणीच्या लग्नाच्या काही वर्षं आधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा मीडियात होत होती. आदित्यने पायलसोबत घटस्फोट घेण्याचे ठरवल्यावर ती गोष्ट चोप्रा कुटुंबाला अजिबातच आवडली नव्हती. पायल ही यश चोप्रा यांच्या मित्राची मुलगी असल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय खूपच अवघड होता. पायलला आदित्यने घटस्फोट देऊ नये असे यश चोप्रा आणि त्यांची पत्नी पॅमेला यांना वाटत होते. त्यामुळे ते दोघे पायलच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. या कारणाने आदित्य कित्येक महिने चोप्रा कुटुंबियांसोबत बंगल्यात न राहाता मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहात होता. पण अखेरीस मुलाच्या हट्टापुढे यश चोप्रा यांना झुकावे लागले आणि आदित्य आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याला त्यांनी होकार दिला.
राणी मुखर्जीच्या प्रेमात पडल्यामुळेच आदित्य चोप्राने पायलला घटस्फोट दिला असे म्हटले जात असले तरी पायलसोबत घटस्फोट झाल्यानंतरच मी आदित्यच्या आयुष्यात आली असे राणीने एका मुलाखतीत सांगितले होते.