सध्या राणी मुखर्जी राजस्थानमधील कडक उन्हात शुटींग करते आहे. या रणरणत्या वाळवंटात राणीचे वेळापत्रक महिनाभर अॅक्शनपॅक राहणार असून फिल्ममधील महाभयंकर, क्रूरकर्मा व्हिलनचा शोध घेऊन त्याचा खात्मा करण्याच्या जोशात तिला वावरावे लागणार आहे. सकाळच्या 42 डिग्री तापमानात खलनायकाचा शोध घेण्याचा सिक्वेन्स कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.
“सध्या कोटा शहराचे तापमान 40 डिग्रीच्या वर गेले आहे आणि काही दिवसांत 43 डिग्रीचा टप्पा पार होईल. राजस्थानच्या कडक उन्हात दिवसाच्या मध्यावर शुटींग करणे फारच जिकिरीची होऊन बसते आहे. सर्वच दृश्यांमध्ये राणी भयंकर अपराध्याचा माग काढताना, त्याचा शोध करताना दिसते आहे, पाठलागाची ही सर्वच दृश्ये कोटामध्ये सर्वात उष्ण दिवसांत शूट करण्यात येत आहेत,” अशी माहिती निर्मिती सूत्रांनी दिली.
“रक्ताचे पाणी करणाऱ्या या जीवघेण्या उन्हात प्रदीर्घ पाठलाग चित्रित करावा लागत होता. आम्हाला एका टेकमध्ये शॉट पूर्ण करायचा होता. राणी दृश्यांचे चित्रिकरण एका टेकमध्ये संपवते अशी तिची ख्याती आहे. यावेळी देखील तिने अशाप्रकारेच चित्रिकरण केले. परंतु दृश्ये पाठलागाची असल्याने आम्ही आणखी 1-2 वेळा शुटींग करावे म्हणून तिचा आग्रह होता. जेणेकरून आम्हाला वेगवेगळे शॉट्स मिळतील. ऊन रणरणते असायचे आणि ती डीहायड्रेड व्हायची, मात्र तिने प्रत्येक टेक पूर्ण केला. स्वत:च्या कामाप्रती तिची असलेली निष्ठा क्रूमधील प्रत्येकाला प्रोत्साहित करायची. शुटींग टीममधील कोणालाच इतक्या जहाल उन्हाची सवय नव्हती. परंतु राणीची वचनबद्धता सर्वांनाच उत्साही करत असे,” हे सूत्रांनी सांगितले.
राणी पुन्हा एकदा निर्भीड आणि वचनबद्ध पोलीस निरीक्षक शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेतून मर्दानी 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. मर्दानीच्या प्रीक्वेलमधील राणीची भूमिका सुपरहिट ठरली होती आणि तिचे बरेच कौतुक झाले होते. त्या सिनेमात राणीने बाल तस्करीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे सिक्वेलमध्ये राणीच्या विरुद्ध कोण खलनायक साकारणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी राणीच्या हिचकीने जगभर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात राणीचे दर्शन घडेल. मर्दानीचा लेखक गोपी पुथरन मर्दानी 2 च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे