राणी मुखर्जीचे चाहते ‘मर्दानी 2’ची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. राजस्थानच्या रणरणत्या उन्हात जवळपास महिनाभर या चित्रपटाचे शूटींग सुरु होते. ‘मर्दानी 2’चे सुमारे ९० टक्के शूटींग राजस्थानात पार पडले. साहजिकच राणी मुखर्जीसोबत ‘मर्दानी 2’च्या अख्ख्या टीमने यासाठी जीवतोड मेहनत घेतली. त्यामुळे शूटींग पूर्ण झाल्यावर राणीने सर्वप्रथम आपल्या टीमचे आभार मानलेत.
टीमच्या प्रत्येक सदस्याला राणी जातीने भेटली. त्यांचे आभार मानलेत. सेटवरच्या एका सदस्याने सांगितले की, राणी सेटवर सगळ्यांशी अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वावरते. सगळ्यांची विचारपूस करणे, त्यांची मदत करणे हा तिचा स्वभाव आहे. तिच्या याच स्वभावामुळे सेटवर उत्साहाचे वातावरण निर्माण होते. ‘मर्दानी 2’चे दुसरे शेड्यूल पूर्ण झाले आहे. आता मुंबईत या चित्रपटाचे अखेरचे शेड्यूल पूर्ण होणार आहे.
‘मर्दानी 2’ या चित्रपटात राणी पुन्हा एकदा एक निर्भय व कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मर्दानी’च्या प्रीक्वेलमधील राणीची भूमिका सुपरहिट ठरली होती आणि तिचे बरेच कौतुक झाले होते. त्या सिनेमात राणीने बाल तस्करीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे सिक्वेलमध्ये राणीच्या विरुद्ध कोण खलनायक साकारणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी राणीच्या ‘हिचकी’ने जगभर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात राणीचे दर्शन घडेल. ‘मर्दानी’चा लेखक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.