Join us

​हिचकी या चित्रपटातील भूमिकेसाठी राणी मुखर्जी नव्हती निर्मात्यांची पहिली पसंती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 5:43 AM

बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश आणि प्रेक्षकांचं कौतुक मिळवलेला राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. ...

बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश आणि प्रेक्षकांचं कौतुक मिळवलेला राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्कमधील अव्वल क्रमांकाच्या हिंदी सिनेवाहिनी, सोनी मॅक्सवर शनिवार २६ मे रोजी रात्री ९ वाजता हा चित्रपट प्रक्षेपित केला जाणार आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हिचकी हा सिनेमा म्हणजे हा आपल्यातील एका व्यंगाला आपली सर्वात मोठी ताकद बनवणाऱ्या एका महिलेची कथा आहे. नैना माथूर (राणी मुखर्जी) हिला शिक्षिका बनायचं आहे. तिला टॉरेट सिंड्रोमचा त्रास असतो. अनेक मुलाखती आणि बहुधा तितक्याच नकारांनंतर ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत पूर्णवेळ शिक्षिका बनून आपले स्वप्न पूर्ण करते. मात्र, थोड्याच काळात तिच्या लक्षात येतं की, या वर्गात सगळी उद्धट, मस्तीखोर मुलं भरलेली आहेत. सतत काही ना खोड्या करण्याचेच उद्योग ही मुलं करत असतात. मात्र, नैना या मुलांसाठी काहीतरी करायचं ठरवते. सर्व अडचणींवर मात करत या मुलांना स्वत:च्या क्षमता कळाव्यात यासाठी ती प्रयत्न करते. सामाजिक जाणिवा मांडणाऱ्या हिचकीसाठी राणी मुखर्जीला दादासाहेब फाळके एक्सलन्स अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. राणीच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केेले. पण तुम्हाला माहीत आहे का, या सिनेमाची कथा खरंतर पुरुष पात्रासाठी लिहिण्यात आली होती. मात्र, जसजशी पटकथा पुढे सरकू लागली तसतसा यातील गाभा अधिक परिणामकारकरित्या मांडण्यासाठी एका स्त्री पात्राची निकड भासू लागली. त्यामुळे, नंतरच्या टप्प्यात राणी मुखर्जीचा मध्यवर्ती भूमिकेत विचार करत पटकथेत आवश्यक ते बदल करण्यात आले. या सिनेमाचं नाव खुद्द आदित्य चोप्रा यांनी सुचवलं आहे. कारण इतक्या अर्थपूर्ण कथेला तितक्याच ताकदीचे आशयपूर्ण नाव हवे होते.राणी मुखर्जीसाठी हा चित्रपट खूपच खास आहे. या चित्रपटाविषयी ती सांगते, काही कथा अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवतात आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रेरणाही देतात. हिचकी ही टॉरेट सिंड्रोम असणाऱ्या आणि शिक्षिका बनू पाहणाऱ्या मुलीचीच कथा नाही तर ही कथा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांचीही आहे. या प्रकारच्या गुंतागुंतीच्या न्युरोलॉजिकल समस्यांसंदर्भात हिचकी अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये जाणीव निर्माण करू शकेल.Also Read : राणी मुखर्जीचा खुलासा, ‘या कारणामुळे आदित्य चोपडाशी केले लग्न’!